मांजरीला ठार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! ‘त्या’ ग्राहकाचा पोलिसांकडून शोध सुरु!

पंतनगर पोलिस आता मांजरीला ठार करणाऱ्या ग्राहकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

72
हॉटेलमध्ये टेबलाखाली घुटमळणाऱ्या मांजरीला लाथेने भिरकावून लावल्याने मांजराचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित ग्राहकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या ग्राहकाच्या शोधासाठी पोलिस आता जंगजंग पछाडत आहेत. घाटकोपर पूर्वेला असणाऱ्या एका हॉटेलात मांजरीच्या हत्येमुळे प्राणीमित्रांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हॉटेलमधील सीसीटीव्हीवरून पोलिस मारेकराचा शोध घेत आहेत.

ग्राहकाने लाथेने मांजरीला भिरकावले! 

घाटकोपर पूर्वेतील कामराज नगर या ठिकाणी असलेल्या  हॉटेल चेतनचे मालक चेतन गौड यांनी स्वीटी नावाची  मांजर पाळली होती, ती हॉटेलातच राहत होती. ३ जुलै रोजी दुपारी एक ग्राहक जेवणासाठी हॉटेलात आला होता, त्यावेळी स्वीटी ही त्या ग्राहकाच्या टेबलाखाली घुटमळत असताना त्या ग्राहकाने तिला लाथेनेच बाजूला केले.

प्राणीमित्र संघटनेकडून गुन्हा दाखल!

स्वीटी मांजर पुन्हा ग्राहकाच्या पायाजवळ येऊन घुटमळायला लागल्यामुळे चिडलेल्या ग्राहकाने तिला जोरात लाथेने भिरकावले असता तिच्या तोंडाला टेबल लागून जखमी झाली. मांजरीच्या व्हिवळण्याच्या आवाजामुळे हॉटेल मालक त्या ठिकाणी धावत आला आणि त्याने मांजरीला जखमी अवस्थेत देवनार येथील प्राण्यांच्या रुग्णालयात आणले असता उपचार सुरू असताना मांजरीचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती प्राणीमित्र ब्रिज भानुशाली यांना कळताच त्यांनी हॉटेल मालकाची भेट घेऊन सविस्तर माहिती घेऊन पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंतनगर पोलिसांनी अनोळखी ग्राहकाविरुद्ध मांजरीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या ग्राहकाच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून ग्राहकाचा शोध सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.