-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी करून पावसाळ्यात वादळीवाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटून पडणे आणि झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत सुरु असला तरी यंदाच्या पावसाळ्यात झाडांची पडझड होण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईमध्ये मोठ्याप्रमाणात हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची (CC Road) कामे आणि यामध्ये योग्यप्रकारची झाडांची काळजी न घेतल्याने यंदाच्या पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात झाडे उन्मळून पडण्याची तसेच झाडाच्या फांद्या तुटून पडण्याची भीती वर्तवली जात आहे. मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मृत तथा धोकादायक झाड कापणे आणि झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यासाठी विभाग कार्यालय निहाय कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार जुन महिन्यापर्यंत विद्यमान कंत्राटदाराची मुदत असून त्यानंतर नवीन कंत्राटदारांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे विद्यमान कंत्राटदारामार्फत सध्या पावसाळ्यापूर्वीची झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जात आहे. (CC Road)
विशेष म्हणजे यंदा झाडांची फांद्यांची छाटणी योग्यप्रकारे होवून झाडांचे सौदर्य कायम राहावे यासाठी प्रयत्न केला जात असला तरी यंदाच्या पावसाळ्याच मोठ्याप्रमाणात झाडे पडण्याची भीती वर्तवली जात आहे. सध्या मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण (CC Road) करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते) तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरण्यासाठी कार्यादेश जारी केले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांचा समावेश असून यातील ५० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे करताना रस्त्यालगत असलेल्या झाडांना धोका पोहोचवला जात आहे. त्यामुळे उद्यान विभागाच्यावतीने रस्ते विभागाला नोटीस पाठवून रस्त्याच्या विकासासाठी खोदकाम करताना किमान एक बाय एक मीटरची जागा सोडून खोदकाम केले जावे असे कळवले आहे. तसेच ज्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, त्या रस्त्याची कामे हाती घेण्यापूर्वी उद्यान विभागाला अवगत करावे तसेच खोदकाम करताना तिथे झाडे असतील तर त्याची काळजी घ्यावी तथा उद्यान अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खोदकाम करावे अशाप्रकारच्या सूचना केल्या आहेत. (CC Road)
(हेही वाचा – कर्नाटकात सत्ताधारी Congress ची दडपशाही; विधानसभेत विरोध करणाऱ्या भाजपाच्या १८ आमदारांना केले निलंबित)
या रस्ते कामांसाठी केलेल्या खोदकामांमध्ये रस्त्यालगतच्या झाडांची पाळेमुळे कापण्यात आलेली आहेत.त्यामुळे अनेक झाडांना धोका निर्माण झाला आहे. ज्या मुळांनी जमीन पकडून ठेवली होती, तीच मुळे कापली गेल्यामुळे झाडांचा अधारच संपुष्टात येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे जर अशाप्रकारे रस्त्यांच्या कामांमध्ये झाडांची मुळे कापली गेली असतील तर ही झाडे येत्या पावसाळ्यात तग धरण्याची शक्यता कमी आहे. अशी झाडे मुसळधार पाऊस किंवा वादळी वाऱ्यांमध्ये पडली जाण्याची शक्यता आहे. (CC Road)
मागील पावसाळ्यात शहरांत ४०४, पूर्व उपनगरांमध्ये ३७७ आणि पश्चिम उपनगरांमध्ये ७९२ अशाप्रकारे एकूण १५७३ झाडे तसेच झाडांच्या फांद्या तुटण्याचे प्रकार घडले होते. मागील वर्षी झालेल्या झालेल्या झाडांच्या दुघर्टनांमध्ये १७ जण जखमी झाले होते आणि दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात वाढत्या सिमेंट काँक्रिटच्या (CC Road) कामांमुळे झाडे पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनीही चिंता व्यक्त केली आहे. झाडांच्या फांद्यांची छाटणी शास्त्रोक्तपणे व्हायला हवी आणि वरच्या बाजूने झाड ज्या बाजुला कलले आहे, त्या बाजुच्या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक असते. आम्ही असताना तसे करून घेत होतो. परंतु, सध्या ज्याप्रकारे रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुर आहेत, त्या कामांमध्ये झाडांची काळजी घेतली जात नाही. खोदकामात झाडांची मुळे कापली गेल्याने यंदाच्या पावसाळ्यात झाडे पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे उद्यान विभागाने रस्त्यालगतच्या झाडांची काळजी घेण्याची गरज आहे, असे धुरी यांनी स्पष्ट केले. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community