-
सचिन धानजी
मुंबई महानगरपालिकेने खड्डेमुक्तीचा ध्यास घेत शहर आणि उपनगरांमधील सर्वच रस्ते सिमेंट काँक्रिटचे (CC Road) करण्याचा निर्णय घेतला. या सर्व रस्त्यांची सर्व कामे एकाचवेळी मंजूर केल्याने विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. मुळात जिथे वर्षाला महापालिका प्रशासन ३०० ते ४०० कोटी रुपयांची सिमेंट काँक्रिटची कामे हाती घ्यायची, तिथे दोन टप्प्यात तब्बल ८०० किलोमीटरहून अधिक लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेतली, तिही तब्बल १२ ते १३ हजार कोटींची. एवढी तर कामे सत्ताधाऱ्यांनी आपल्या काळात केली नव्हती. त्यामुळे एकाचवेळी सिमेंट काँक्रिटची कामे घेण्यात आल्याने या कामांना गती मिळत आहे. एरव्ही टक्केवारीतच सांगायचे झाल्यास सिमेंट काँक्रिटच्या रस्ते (CC Road) कामांची टक्केवारी २० तर डांबरीकरणाची ८० टक्के असायची. परिणामी डांबरीकरणाच्या रस्त्यांवरच पावसाळ्यात खड्डे पडत असल्याने वारंवार विकास करूनही मुंबई खड्ड्यातच जात असल्याने तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत रस्ते खड्डेमुक्तीचा संकल्प करून सर्वच रस्त्यांचा विकास सिमेंट काँक्रिटचा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज आपल्याला सिमेंट काँक्रिटची कामे सुरु असलेली पहायला मिळत आहेत. पण ही कामे वेगाने सुरु असली तरीही कामांमध्ये गुणवत्ता आहे किंवा त्यांचा योग्य दर्जा राखला जातो का, याबाबत साशंकता आहे. (CC Road)
अर्थसंकल्प मांडल्यानंतर मागील आठवड्यात महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी रस्ते कामांचा आढावा घेत, काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यापूर्वी रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा, अशा सूचना संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना केल्या. तसेच उपयोगिता सेवा वाहिन्यांसाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवावा. काँक्रिटीकरण कामे अधिकाधिक गतीने पूर्ण व्हावीत, या दृष्टीने नियोजन करावे, असे काटेकोर निर्देशही त्यांनी दिले. पण निर्देश देतानाच त्यांनी काँक्रिटीकरण (CC Road) कामांचा दर्जा, गुणवत्ता यांच्याशी कदापी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, याची दक्षता बाळगा, असाही गर्भित इशारा दिला. पण इशाऱ्यानंतर प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी होणारी चालूगिरी थांबणार आहे का? आयुक्त, तसेच अतिरिक्त आयुक्त प्रत्येक कामांची पाहणी करणार आहेत का? याच रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आपल्याच मतदारसंघातील तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मतदारसंघातील नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याच्या पृष्ठभागावरच तडे पडलेले पहायला मिळाले. (CC Road)
(हेही वाचा – आता तिकीट, कॅब, हॉटेल सर्व काही एकाच अॅपवर बुक करता येणार ; कधीपासून वापरता येईल SwaRail अॅप)
अभियांत्रिकी भाषेत हे तडे तथा चिरा वरच्या भागांत असून खालील बाजुस नसल्याने त्याला धोका नाही. परंतु याच चिरा भविष्यात अतिउष्ण तापमानाने अधिक वाढवून त्या तळापर्यंत पोहोचणार नाहीत याची हमी कोण देणार? अशा प्रकारची सर्टीफिकेट देऊन अभियंते हे कंत्राटदारांचा हमी कालावधी पूर्ण होण्याची वाट पाहतात आणि त्यांचे तोपर्यंतचे पैसे देवून मोकळे होतात. पण जर अशाप्रकारे तडे गेलेले असतील तर पुन्हा तोडायला लावून नवीन बनवण्यास भाग पाडण्याचे प्रमाण फारच कमी आहे. दादरमधील समर्थ व्यायाम मंदिर रोड, पाटील रोड तसेच माहिम येथील रस्त्यांचे बांधकाम असे निकृष्ट बनल्याने ते तोडण्यास भाग पाडले गेले तरी आजही समर्थ मंदिर रोडवरील तडे तसेच आहेत, जणू काही तो रस्ता दहा वर्षांपूर्वी बनवला गेला असेल असे भासते. त्यामुळे जर दर्जेदार नसेल तर ते काम पुन्हा करून घेण्यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी नाही या गोंड्स नावाखाली त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या कामांची पाहणी करण्यासाठी आयआयटी मुंबईची नियुक्ती केली असली तरी ही संस्था सर्वच रस्त्यांची पाहणी करणार का किंवा त्यांनी सूचवल्यानंतर काही निकृष्ट बांधकाम झालेल्या रस्त्यांचा भाग तोडून तिथे पुनर्बांधकाम होणार का हा प्रश्न आहे. शेवटी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने तसेच कंत्राटदारावर राजकीय वरदहस्त असल्याने अधिकारीही कंत्राटदाराच्या विरोधात जाण्याचे धाडस दाखवत नाही. (CC Road)
आज उबाठा शिवसेनेचे नेते आणि माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे हे रस्ते सिमेंट काँक्रिटच्या कामांच्या कंत्राटावर आगपाखड करत असले तरी त्यांची महापालिकेत सत्ता असताना तसेच अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास असताना २०१३-१४ ते २०१५-१६ या तीन वर्षांचा रस्ते विकासकामांचा बृहत आराखडा तयार करून १२३९ किलो मीटर लांबीच्या रस्त्यांची ७७७४ कोटी रुपयांची कामे हाती घेतली होती. पण एवढे कोटी रुपये खर्च करूनही मुंबईकरांना दिलासा मिळाला का? तर नाही! कारण त्यानंतरही खड्ड्यांची समस्या कायमच राहिली. पण याचा एक फायदा झाला की त्याआधी २७ वर्षांत जिथे केवळ १९२ सिमेंट काँक्रिटद्वारे रस्त्यांचा (CC Road) विकास झाला होता, तिथे २०२२ पर्यंत ५०० ते ५५० किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनले. त्यामुळे मनात आणले तर प्रशासन काहीही करू शकते. असो, रस्त्यांवर खूप काही बोलता येवू शकते, पण करदात्यांचा पैसा खर्च करताना त्यांचा लाभ पुढील ३० ते ३५ वर्षे जनतेला व्हावा, त्यांना पुन्हा खड्ड्यात पडण्याची वेळ येऊ नये हीच किमान अपेक्षा. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community