-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
आरे वसाहतीतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामात अक्षम्य दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारास महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या निविदा प्रक्रियेत पुढील दोन वर्षांसाठी सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, स्लम्प टेस्टमध्ये त्रुटी आढळल्याने दोन रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पांची (आरएमसी प्लांट्स) नोंदणी रद्द करण्यात आली आहे. पुढील ६ महिन्यांसाठी महानगरपालिकेच्या कोणत्याही कामांसाठी काँक्रिट मिक्सचा पुरवठा करण्यास त्यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच २ रस्ते कंत्राटदारांना प्रत्येकी २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. रस्ते काँक्रिटीकरण कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, त्रुटी खपवून घेतली जाणार नाही, तसे आढळल्यास कठोर कारवाई करू, असा इशाराही महानगरपालिका आयुक्तांनी दिला आहे. (CC Road)
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यस्थळी आकस्मिक भेट
मुंबईत सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. येत्या ३१ मे २०२५ पूर्वी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णत्वास जावे, यासाठी सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करण्यात आले आहे. प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निश्चित तारीख ठरविण्यात आली आहे. तसेच, रस्त्यांची कामे सुरू असताना अभियंत्यांनी उपस्थित रहावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यस्थळी आकस्मिक भेट (सरप्राईज व्हिजिट) द्यावी, कामे अधिक वेगाने पार पाडताना गुणवत्तेवरही भर द्यावा आणि निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरोधात कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. (CC Road)
(हेही वाचा – Indian Share Market : डिसेंबर २०२५ पर्यंत भारतीय सेन्सेक्स ८३,००० हजारांवर असेल; जागतिक संशोधन कंपनीचा अंदाज)
दंडाची आकारणी करुन निकृष्ट काम त्वरित दुरुस्त
आरे वसाहतीतील दिनकरराव देसाई मार्गाचे सिमेंट काँक्रिट व मास्टिक अस्फाल्ट सुधारणा काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सदर रस्त्याच्या कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यामुळे कंत्राटदारास नोटीस बजावण्यात आली. तसेच, दंडाची आकारणी करुन निकृष्ट काम त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, दुरुस्तीच्या कामातही कंत्राटदाराने अक्षम्य दिरंगाई केली. याबाबत कंत्राटराकडून खुलासा मागवण्यात आला, परंतु समाधानकारक खुलासा नसल्यामुळे कंत्राटदारास मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या निविदा प्रक्रियेत पुढील २ वर्षांसाठी सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ५ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. (CC Road)
काँक्रिटीकरणासाठी आलेले मिश्रण (लोड) नाकारण्यात आले
मुंबई अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी २० मार्च २०२५ रोजी रात्री ‘एम पूर्व’ विभागातील डॉ. नीतू मांडके मार्ग येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला आकस्मिक भेट दिली. या भेटीदरम्यान स्लम्प चाचणी घेण्यात आली. रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पस्थळी आढळलेला स्लम्प १६० मिमी इतका होता. तर प्रत्यक्ष कार्यस्थळी स्लम्प १७० मिमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे काँक्रिटीकरणासाठी आलेले मिश्रण (लोड) नाकारण्यात आले आणि संबंधित मिक्सर वाहन माघारी पाठविण्यात आले. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराकडून खुलासा मागविण्यात आला. मात्र, खुलासा समाधानकारक नसल्याने या प्रकारातील हलगर्जीपणाबाबत संबंधित रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पास २० लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच, पुढील ६ महिन्यांसाठी महानगरपालिकेच्या कोणत्याही कामांसाठी काँक्रिट मिक्सचा पुरवठा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. (CC Road)
(हेही वाचा – पंतप्रधान Narendra Modi दिल्लीतील आंबा महोत्सवाचे करणार उद्घाटन)
कंत्राटदार आणि रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पास नोटीस
मागील १ एप्रिल २०२५ रोजी रात्री अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बी विभागातील कारागृह मार्ग या ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते कामास आकस्मिक भेट दिली. यावेळी रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पामधून आलेले काँक्रिट मिश्रण असमाधानकारक आढळले. रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पस्थळी आढळलेला स्लम्प ६५ मिमी इतका होता, तर प्रत्यक्ष कार्यस्थळी स्लम्प १८० मिमी असल्याचे आढळून आले. याबाबत कंत्राटदार आणि रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पास नोटीस बजाविण्यात आली. नजरचुकीने हा प्रकार घडल्याचे त्यांनी खुलाश्यामध्ये नमूद केले. मात्र, गुणवत्तेशी तडजोड न करण्याची भूमिका कायम ठेवत महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटदारास २० लाख रूपयांचा दंड आकारला आहे. तर, रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पाची नोंदणी रद्द करत पुढील ६ महिन्यांसाठी महानगरपालिकेच्या कोणत्याही कामांसाठी काँक्रिट मिक्सचा पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. (CC Road)
कामात त्रुटी आढळल्या तर जबाबदार व्यक्ती तथा संस्था यांच्याविरोधात…
अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले की, काँक्रिट रस्ते कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी महानगरपालिका अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. कामात त्रुटी आढळल्या तर जबाबदार व्यक्ती तथा संस्था यांच्याविरोधात अत्यंत गंभीर कारवाई केली जाऊ शकते. या दृष्टिकोनातून रस्ते कामांत सर्व कंत्राटदारांनी अधिक सजग राहणे अपेक्षित आहे. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. दोषींवर सक्त कारवाई केली जाईल, असे बांगर यांनी नमूद केले. (CC Road)
(हेही वाचा – New Toll Policy 2025 : ३००० रुपये भरा; वर्षभर टोलमुक्त प्रवास करा)
‘स्लम्प टेस्ट’ चे महत्त्व
काँक्रिटच्या कार्यवहन क्षमतेसाठी (वर्क एबिलीटी) ‘स्लम्प टेस्ट’ करण्यात येते. याचा उपयोग काँक्रिटमध्ये सिमेंट व पाण्याचे प्रमाण किती आहे हे मोजण्यासाठी केला जातो. जर काँक्रिटमध्ये अतिरिक्त पाणी मिसळले तर, काँक्रिटमधील सिमेंट व पाण्याचे प्रमाण गडबडते. त्याचा थेट परिणाम गुणवत्तेवर होतो. त्यामुळे रस्ते बांधणी कामात ‘स्लम्प टेस्ट’ ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काँक्रिटची गुणवत्ता तपासण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पस्थळ आणि प्रत्यक्ष कार्यस्थळ या दोन्ही ठिकाणी ‘स्लम्प टेस्ट’ बंधनकारक केली आहे. (CC Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community