CC Road : पूर्व उपनगरांतील रस्त्यांची कामे धिम्यागतीने; ३१ मे नंतरही अपुर्णावस्थेत रस्ते राहिल्यास कंत्राटदारांवर कारवाई

488
CC Road : पूर्व उपनगरांतील रस्त्यांची कामे धिम्यागतीने; ३१ मे नंतरही अपुर्णावस्थेत रस्ते राहिल्यास कंत्राटदारांवर कारवाई
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

पूर्व उपनगरांमध्ये पहिल्या टप्प्यातील रस्ते काँक्रिट कामांची गती अत्यंत मर्यादित आहे. कंत्राटदाराने कार्यपद्धतीत सुधारणा न केल्यास ते कंत्राट काढून घेण्याचा आणि कठोर कारवाई करण्याचा निर्वाणीचा इशारा महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दिला आहे. काही कंत्राटदार अपेक्षित गतीने तर काही कंत्राटदार धीम्या गतीने कामे करत आहेत. त्यामुळे ही रस्त्यांची कामे येत्या ३१ मे २०२५ पूर्वी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण कामे पूर्णत्वास गेली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले. ३१ मे २०२५ नंतर एकही रस्ता अपूर्ण अवस्थेत आढळता कामा नये. जर, एखादा रस्ता अपूर्णावस्थेत आढळला तर संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कठोर स्वरूपाची कारवाई केली जाईल,असाही इशारा गगराणी यांनी दिला आहे.

मुंबईतील सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शुक्रवारी ४ एप्रिल २०२५ रोजी रस्ते कामांचा कंत्राटनिहाय आढावा घेत संवाद साधला. महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम यांच्यासह संबंधित अधिकारी, कंत्राटदारांचे प्रतिनिधी, विविध सेवा संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (CC Road)

(हेही वाचा – Drunk Driver : मद्यपी वाहन चालकांवर आता थेट गुन्हे दाखल होणार; मुंबई वाहतूक विभागाचा निर्णय)

रस्त्यांवरील टीका सकारात्मक घ्या, संधी आणि आव्हान म्हणून पहा!

मुंबई महानगरात सिमेंट काँक्रिट रस्ते बनवण्याच्या कामात महानगरपालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून ही टीका सकारात्मकपणे घ्यावी, संधी व आव्हान म्हणून तिच्याकडे पाहावे,अशी सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना केले आहे. सध्या सुरु असलेली काँक्रिटीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली तर खड्डे पडण्याच्या समस्येचे प्रमाण कमी होईल, मात्र,काँक्रिटीकरणाची कामे अधिक गतीने करताना गुणवत्तेशी तडजोड कदापि खपवून घेतली जाणार नाही. त्यादृष्टीने अधिक सजग राहावे, असेही निर्देश गगराणी यांनी दिले आहेत.

येत्या ३१ मे २०२५ पूर्वी रस्त्यांची कामे पूर्णत्वास गेली पाहिजे

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महानगरपालिकेने रस्ते काँक्रिटीकरणाची मोहीम हाती घेतली आहेत. आतापर्यंत १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामधील एकूण ६९८ रस्त्यांची कामे (३२४ किलोमीटर) तर, दुसऱ्या टप्प्यात एकूण १४२० रस्त्यांचे (३७७ किलोमीटर) काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे. ही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. रस्ते कामांसाठी ९ कंत्राटदार नेमण्यात आले असून त्यांच्यामध्ये कामाच्या प्रगतीत फरक आहे. काही कंत्राटदार अपेक्षित गतीने तर काही कंत्राटदार धीम्या गतीने कामे करत आहेत. त्या अनुषंगाने या बैठकीत कंत्राटदारनिहाय आढावा घेत येत्या ३१ मे २०२५ पूर्वी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण कामे पूर्णत्वास गेली पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले. (CC Road)

(हेही वाचा – IPL 2025, Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये यशस्वी गोलंदाजांच्या मांदियाळीत दाखल)

कंत्राटदार दुर्लक्ष करत असेल तर…

महानगरपालिका आयुक्त गगराणी म्हणाले की, अजूनही दोन महिन्यांचा कालावधी हातात आहे. या कालावधीत विद्यमान सुरु असलेली कामे पूर्ण करणे शक्य आहे. रस्ते कामे सुरू असताना कंत्राटदारांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्तारोधक (बॅरिकेडिंग), प्रदूषण टाळण्यासाठी हिरवे कापडी आच्छादन (ग्रीन नेट) चा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. कामे सुरू असताना काही कमतरता राहिल्यास कंत्राटदारांनी सजग राहून तात्काळ दुरुस्ती करावी. कंत्राटदार दुर्लक्ष करत असेल किंवा जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी करत असेल, तर कठोर स्वरूपाची कारवाई केली जाईल, असे गगराणी यांनी स्पष्ट केले.

काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाल्यावर पदपथ चालण्यायोग्य, सुस्थितीत असावेत

पूर्व उपनगरांमध्ये पहिल्या टप्प्यातील काँक्रिट कामांची गती अत्यंत मर्यादित आहे. कंत्राटदाराने कार्यपद्धतीत सुधारणा न केल्यास ते कंत्राट काढून घेण्याचा आणि कठोर कारवाई करण्याचा निर्वाणीचा इशारा यावेळी देण्यात आला. काँक्रिट रस्ते पूर्ण झाल्यावर पदपथ चालण्यायोग्य, सुस्थितीत असावेत. संपूर्ण रस्ता स्वच्छ असावा. ज्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, त्या रस्त्यांवर थर्मोप्लास्ट, झेब्रा क्रॉसिंग, कॅट आयज, चौकांमध्ये पिवळ्या थर्मोप्लास्ट रंगाचे ग्रीड बसविणे इत्यादी कामे पूर्ण करावीत, जेणेकरून त्या रस्त्यांची उपयुक्तता खऱ्या अर्थाने साध्य होईल, तसेच परिसराच्या सौंदर्यात भर पडेल, असेही गगराणी यांनी नमूद केले. (CC Road)

(हेही वाचा – मराठी भाषेबाबत MNS आक्रमक; कल्याणमध्ये बँकांना दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम)

जलदेयकांची रक्कम प्रलंबित असल्यास अभियंता जबाबदार

कंत्राटदारांना जाणवणाऱ्या समस्यांवरही या बैठकीत चर्चा झाली. मोठ्या प्रमाणात रस्ते कामे करताना जर देयकांची रक्कम विनाविलंब मिळाली, तर कामांची गती राखण्यास मदत होते. त्यामुळे देयके विनाविलंब अदा करावीत, अशी विनंती कंत्राटदारांनी केली. देयके जर अकारण प्रलंबित ठेवली तर अभियंत्यांना वैयक्तिक जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असे महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी नमूद केले. काही कंत्राटदारांनी निविदा अटींबाबत अनुषंगिक बाबी उपस्थित केल्या. त्यावर नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असे गगराणी यांनी स्पष्ट केले.

‘डक्ट’चा वापर करण्यासंदर्भात उपयोगिता वाहिन्यांच्या संस्थांसमवेत समन्वय

विविध सेवा तथा उपयोगिता (युटिलिटी) वाहिन्यांच्या संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. रस्त्यांची कामे सुरू असताना उपयोगिता वाहिन्यांचे त्वरित स्थलांतरण करावे. काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाल्यावर रस्ता खोदण्यास कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर ‘डक्ट’ बांधत आहे. या ‘डक्ट’चा वापर करण्यासंदर्भात उपयोगिता वाहिन्यांच्या संस्थांसमवेत समन्वय ठेवावा. डक्टचा अधिकाधिक वापर करण्यासंदर्भात सुनिश्चित करावे. उपयोगिता वाहिन्यांच्या संस्थांच्या अडचणी असतील, तर त्यातून मार्ग काढावा, असे निर्देश देखील महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अखेरीस दिले. (CC Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.