-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
वांद्रे (पश्चिम) येथील पाली हिल परिसरातील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट लेन या रस्त्याच्या नियोजित काँक्रिटीकरण कामास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी तूर्त स्थगिती दिली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यानुसार, संबंधित रहिवाशांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्याआधारे योग्य निष्कर्ष काढून पुढील यथोचित निर्णय घेण्यात घ्यावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. (CC Road)
ऑक्झिलियम कॉन्व्हेंट लेन भागातील रहिवाशांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट लेन ही सध्या सुस्थितीत आहे. हा रस्ता लहान, अरुंद व टोकाकडचा भाग आहे, त्यामुळे तिथे फारशी रहदारी नसते. तसेच, या रस्त्याला लागून पूर्ण वाढ झालेले वृक्ष आहेत. काँक्रिटीकरण काम सुरु असताना त्यांना हानी पोहोचू शकते. या रस्त्याच्या अखेरीस मुलींची प्राथमिक शाळा असून रस्ते काम सुरु झाल्यानंतर त्यांना ये-जा करण्यास अडचणी उद्भवू शकतात. तसेच, याठिकाणी असलेल्या इमारतींमध्ये राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या तुलनेने अधिक असल्याने त्यांना धुळीचा त्रास होऊ शकतो. याच रस्त्यावरील एका इमारतीचे पुनर्विकास काम लवकरच सुरु होणार असून पर्यायाने स्थानिक रहिवाशांच्या अडचणी वाढतील. एवढेच नव्हे तर आगीसारख्या घटना अथवा वैद्यकीय अणीबाणीच्या प्रसंगात आत्यंतिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते, इत्यादी बाबी रहिवाशांनी निवेदनात नमूद केल्या आहेत. (CC Road)
या निवेदनाची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी ऑक्झिलियम कॉन्व्हेंट लेन या रस्त्याच्या नियोजित काँक्रिटीकरण कामास तूर्त स्थगिती दिली आहे. तसेच, संबंधित रहिवाशांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्याआधारे योग्य निष्कर्ष काढून पुढील यथोचित निर्णय घेण्यात घ्यावा, असे निर्देशही आयुक्तांनी रस्ते विभागास दिले आहेत.(CC Road)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=f8JhkUHbjJ4
Join Our WhatsApp Community