मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशय, मालाड टेकडी जलाशय, महावीर नगर टनेल आणि मालाड लिबर्टी गार्डन टनेल आदी ठिकाणच्या सुरक्षा आणि चोरीच्या दृष्टीकोनातून या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे या सीसीटीव्ही कॅमे-यांच्या माध्यमातून या जलाशयांची सुरक्षा कडक केली जाणार आहे.
मुंबई शहर, उपनगर तसेच मुंबई बाहेरील विभागातून ३०० ते १८०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी मुंबईत आणले जाते. मुंबई बाहेरील तलावातून आणले जाणारे पाणी बोरीवली टेकडी जलाशय, मालाड टेकडी जलाशय, महावीर नगर टेकडी जलाशय आणि लिबर्टी गार्डन टनेल आदी पश्चिम उपनगरांमधील जलाशयांमध्ये जमा करून विभागातील जनतेला त्यातून पाणी पुरवठा केला जात आहे.
(हेही वाचा आता कपिल सिब्बल तिसऱ्या आघाडीसाठी घेणार पुढाकार; काय आहे अजेंडा?)
त्यामुळे येथील सुरक्षेच्या दृष्टीकाकोनातून तसेच चोरीच्या दृष्टीकोनातून संपूर्ण परिसर सीसीटिव्हीच्या नियंत्रणाखाली घेऊन सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा निर्णय महापालिकेच्या जलअभियंता विभागाने घेतला आहे. त्यामुळे यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये कॉमटेक टेलिसोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही पात्र ठरली असून या कंपनीला या चार ठिकाणच्या जलाशयांच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये हे कॅमेरे याठिकाणी बसवले जाणार असून काम पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन वर्ष त्यांचा हमी कालावधी असणार आहे. यासाठी २ कोटी ८९ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या कंपनीने यापूर्वी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील सीसी टीव्ही कॅमेरे बसवले असून या अनुभवाच्या आधारे या कंपनीने हे काम मिळवले आहे.
Join Our WhatsApp Community