ब्रिटीशकालीन गटारांच्या अंतर्मनातील शोध घेणार महापालिका!

मुंबई शहरातील पर्जन्य जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून, प्रत्येक पर्जन्य जलवाहिनीवरील मॅनहोल्समधून शक्य तेवढा गाळ काढला जातो. परंतु दोन मॅनहोल्समधल्या जागेतील हा गाळ तसाच कायम असून, या सर्व पर्जन्य जलवाहिन्या आजमितीस सुमारे ८० टक्के एवढ्या भरलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईत पावसाळ्यात ३८० ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांची कामे हाती घेतानाच, शहरातील ब्रिटीशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांच्या अंतर्मनाचा शोध घेणे ही आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे या पावसाळी गटारांमध्ये प्रत्यक्षात किती गाळ आहे, किती भरलेल्या आहेत किंवा तुटलेल्या आहेत याचा शोध आता रोबोटिक सी.सी.टिव्ही कॅमेराद्वारे घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे सध्या जी कामे हाती घेतली आहेत, ती कामे केल्यानंतर खऱ्या अर्थाने पूरपरिस्थितीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

दहा कोटींचा खर्च

मुंबई शहर व उपनगरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरता पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. शहर भागात जमिनीखाली असलेल्या ब्रिटीशकालीन पावसाळी गटारांचे, बॉक्स व आर्च ड्रेनेजच्या मोठ्या प्रमाणावरील जाळयांची देखभाल ही पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत केली जाते. सध्या या खात्यााकडे असलेल्या मनुष्यबळ व मशिनरीच्या सहाय्याने होते. या वाहिन्यांमधील काही पर्जन्यवाहिन्या या फारच जुन्या आहेत, तसेच २०२०च्या पावसाळ्यामध्ये शहरातील बऱ्याच भागात पाणीही साचले होते. त्यामुळे पर्जन्य जलवाहिन्यांचे सी.सी.टिव्ही कॅमरेद्वारे निरीक्षण करुन त्याची स्थिती मूल्यांकन करुन नोंद घेण्यात येणार आहे. शिवाय कुलाबा ते धारावी-माहिम या शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांचे भौगोलिक भूरचना सर्वेक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेने ग्रॅव्हीट इंजिनिअरींग वर्कस् आणि एन.के. शाह इन्फ्राप्रोजेक्ट या दोन कंपन्यांची निवड केली आहे. यासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

(हेही वाचाः शिवसेना मुंबई महापालिकेला बनवणार भिकारी! राज्यात मोफत लसीकरण महापालिकेच्या पैशातून?)

सी.सी.टिव्ही सर्वेक्षण महत्वाचे ठरणार

मुंबईतील ज्या भागांमध्ये पाणी तुंबले जाते, अशा सखल भागातील पूरपरिस्थितीची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेच्यावतीने अभ्यास करुन, त्यांच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. त्या कामांच्या ५८ प्रस्तावांना मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये मंजुरी देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यामध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील ३८० पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या कामांच्या प्रस्तावांना गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या सर्व कामांचे प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीपुढे आणून मंजूर करण्यात आले आहेत. आता याच कामाच्या अनुषंगाने शहरातील जुन्या ब्रिटीशकालीन पावसाळी गटारांची पाहणी करणे आणि त्यातील गाळ असेल तर साफ करणे, गटार तुटलेले असल्यास दुरुस्त करणे यासाठी सी.सी.टिव्ही सर्वेक्षण महत्वाचे ठरणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here