डॉ. आंबेडकरांची जयंती चैत्यभूमीवर न येता घरीच साजरी करा! महापालिका प्रशासनाचे आवाहन

चैत्यभूमी येथे दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच निर्जंतुकीकरण, तपासणी आदी कोविड प्रतिबंधात्मक खबरदारीही घेण्यात येणार आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी जयंती दिनाच्या निमित्ताने दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे करण्यात येत असलेल्या पूर्व तयारीची महापालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी ९ एप्रिल रोजी पाहणी केली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष व्यवस्थेसह आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. दर्शनासाठी येणाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे. पण अनुयायांनी यंदा घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन संजीव जयस्वाल यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

चैत्यभूमीच्या तयारीचा घेतला आढावा!  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजे प्रतिवर्षी १४ एप्रिल रोजी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी अनुयायी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर वेगवेगळ्या सुविधांची कामे हाती घेतली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने पुष्ट सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती यांचा समावेश असतो. यंदाच्या १३० व्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे सध्या सुरु आहेत. या कामांचा आढावा अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कामांची पाहणी करुन घेतला. तसेच आवश्यक ते निर्देशही दिले.

(हेही वाचा : दहावी-बारावीची परीक्षा जूनमध्ये होणार?)

दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांची चाचणी करणार!   

कोरोना विषाणू संसर्गाचा पुन्हा वाढलेला धोका पाहता राज्य शासनासह महानगरपालिका देखील सतर्क व सज्ज आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जयंती दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना व इतर सर्व कार्यवाही करण्यात येणार आहे. परंतु, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून एकत्र येण्यावर असलेल्या निर्बंधांचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे. चैत्यभूमी येथे दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच निर्जंतुकीकरण, तपासणी आदी कोविड प्रतिबंधात्मक खबरदारीही घेण्यात येणार आहे.

शासकीय कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण!   

यंदा शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, जेणेकरुन अनुयायांसह सर्वांना आपापल्या घरी राहून, स्थानिक स्तरावरुन अभिवादन करता येईल. प्रत्यक्ष चैत्यभूमी येथे न येता, अनुयायांना अभिवादन करणे शक्य व्हावे म्हणून थेट प्रक्षेपणाची ही विशेष सोय करण्यात येत आहे. त्याचीही माहिती जयस्वाल यांनी यावेळी जाणून घेतली. याप्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, उप जिल्हाधिकारी कल्याण पांढरे, परिमंडळ २ चे महापालिका उपायुक्त विजय बालमवार, पोलीस उप आयुक्त प्रणय अशोक, जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिर्वाण दिन समन्वय समितीचे महेंद्र साळवे, नागसेन कांबळे व भारतीय बौद्ध महासभेचे प्रदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here