‘रमजान ईद’ घरीच साजरा करा! गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदकरीता मुस्लिम बांधवांनी नमाज पठण, इफ्तारसाठी मशिदीमध्ये न येता घरातच साजरे करुन 'ब्रेक द चेन' आदेशाचे काटेकोर पालन करण्याचा सरकारचा हा आदेश आहे.

121

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’ या आदेशान्वये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी व संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. यावर्षी १३ एप्रिलपासून मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला असून १३, १४ मे २०२१ (चंद्रदर्शनावर अवलंबून) रोजी रमजान ईद (इद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. सध्या कोविड – १९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अति संसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्ण संख्येचा विचार करता शासनाच्या १३ एप्रिल, २०२१ च्या आदेशामधील तरतुदींच्या अधिन राहून विशेष खबरदारी घेत रमजान ईद साजरी करणे आवश्यक आहे.

रमजान ईदच्या निमित्ताने या आहेत मार्गदर्शक सूचना!

  • कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करीता मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करणे उचित ठरेल.
  • नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.
  • रमजान ईद निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्यावेळी व्यतिरिक्त बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
  • कोविड-१९ या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात फौ.दं.प्र.सं.कलम १४४ लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे संचारबंदीच्या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.
  • रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.
  • धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.
  • रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
  • कोविड-१९ च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.