#महिलादिन२०२२ : महिला दिनानिमित्त शिक्षणमंत्र्यानी केले आवाहन!

70

राज्यात ८ ते १२ मार्चपर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निमित्त राज्य, जिल्हा आणि शाळास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

( हेही वाचा : International Women’s Day: महिला पोलिसांसाठी ‘ही’ अनोखी भेट )

यावर्षी महिला दिन सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत

  • 8 मार्च रोजी ‘जागर जाणिवांचा’ या उपक्रमात शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते मुलींच्या सक्षमीकरणास पोषक उपक्रमांचे उद्घाटन होईल.
  • 9 मार्च रोजी महिला सक्षमीकरण व समाजाचा बदलता दृष्टीकोन उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या श्रुती तांबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात येईल.
  • 10 मार्च रोजी ‘घे भरारी’- करिअरच्या नवीन संधींबाबत मुरूड येथील प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर आर्थिक स्त्रोतांची माहिती देऊन मार्गदर्शन करतील. 11 मार्च रोजी महिलांविषयी कायदे आणि जाणीव जागृती बाबत ॲड. दिव्या चव्हाण मार्गदर्शन करतील.
  • 12 मार्च रोजी ‘माझी सखी, माझी सहचारी’ उपक्रमांतर्गत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेले स्नेहग्राम संस्थेचे विनया निंबाळकर व महेश निंबाळकर यांची मुलाखत आयोजित करण्यात येईल.

याचप्रमाणे जिल्हा, तालुका आणि शाळास्तरावर वक्तृत्व स्पर्धा, अनुभव कथन, समुपदेशन, चर्चासत्र, महिला सक्षमीकरणावर आधारित चित्रपट/ चित्रफितीच्या साहाय्याने अभिव्यक्ती तसेच जिल्ह्यातील प्रेरणादायी महिलेचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहेत.

हॅशटॅग वापरत अपलोड करा

या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन #महिलादिन२०२२ #womensdaymh2022 या #hashtag चा उपयोग करून उपक्रमाशी संबंधित व्हिडिओ व साहित्य विविध समाजमाध्यमांवर (Facebook, Instragram, Twitter) अपलोड करावे, असे आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.