मुंबईतील बहुचर्चित ४०० किलोमीटर रस्ते सिमेंट काँक्रिटच्या कामांपैकी ५२ किलो मीटर लांबीच्या कामांना रविवारपासून प्रारंभ

134

मुंबई महानगरातील रस्ते कायमस्वरुपी खड्डेमुक्त करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून महानगरपालिकेने रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण काम हाती घेतले आहे. त्यातील मंजूर केलेल्या सुमारे ४०० किलो मीटर लांबीच्या एकूण रस्ते कामांपैंकी एकूण ५२ किलोमीटर लांब अंतराच्या १११ रस्ते कामांची सुरुवात पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. यामध्ये पूर्व उपनगरातील ११.०६ किलोमीटर लांबीचे २४ रस्ते, पश्चिम उपनगरातील ३१ किलोमीटर लांबीचे ६१ रस्ते आणि शहर विभागातील ९.६६ किलोमीटर लांबीचे २६ रस्ते समाविष्ट आहेत.

महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण मुंबई महानगराचे सुशोभीकरण करण्यासाठी ५०० कामांचा समावेश असलेला विशेष प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहे. या प्रकल्प अंतर्गत अतिरिक्त ३२० कामे हाती घेण्यात येत असून त्यांचे भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते रविवारी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजता चेंबूर (पश्चिम) मध्ये टिळक नगर परिसरातील लोकमान्य टिळक क्रीडांगण येथे होणार आहे.

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक खासदार पूनम महाजन, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, आमदार सुनिल शिंदे, आमदार राजहंस सिंह, इतर लोकप्रतिनिधी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्यासह विविध मान्यवर या समारंभास उपस्थित राहणार आहेत.

(हेही वाचा – मुंबईतील ३४ टक्के नागरिकांना रक्तदाब; १८ टक्के मुंबईकरांचा उपाशीपोटी वाढतोय मधुमेह)

मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण अंतर्गत, एकूण ५२ किलोमीटर लांबी असलेल्या १११ रस्त्यांच्या कामांचा प्रत्यक्ष प्रारंभ तसेच, टिळक नगर, नेहरु नगर व सहकार नगरातील मलनिस्सारण वाहिन्या कामांचे भूमिपूजन देखील या निमित्ताने होणार आहे. महानगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प खात्याद्वारे चेंबूर भागातील म्हाडा वसाहतीमधील टिळक नगर, कुर्ला परिसरातील नेहरु नगर व सहकार नगर मधील विद्यमान मलनिःसारण जाळ्याची सुधारणा करण्यासाठी विविध रस्त्यांवर मलनिःसारण वाहिनी पुरविणे व वाहिन्या टाकणे ही कामे केली जाणार आहेत. पैकी टिळक नगरामध्ये १,३९० मीटर लांब, नेहरु नगरामध्ये १,५५० मीटर लांब तर सहकार नगर येथे २०० मीटर लांब अंतराचे मलनिस्सारण जाळे उन्नतीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे.

मुंबईतील सुमारे १२१ सुशोभिकरणाची कामे पूर्ण

मुंबई सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ५०० कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते ८ डिसेंबर २०२२ आणि १० डिसेंबर २०२२ रोजी समारंभपूर्वक करण्यात आले होते. आजवर सुमारे १२१ कामे पूर्ण झाली आहे. त्या कामांना जनतेकडून मोठा प्रतिसाद लाभत आहे. उर्वरित कामेही प्रगतिपथावर आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त ३२० कामे प्रशासनाने हाती घेतली आहेत. या कामांचे भूमिपूजनही होणार आहे. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पामुळे मुंबईचा कायापालट होतो. येणाऱ्या काळात मुंबई महानगर अधिक सुंदर व देखणे होईल, असा विश्वसास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.