महानगरपालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशाह मेहता यांच्या पुतळ्याची शताब्दी

128

‘मुंबईचा सिंह’ म्हणून इतिहासात अढळ स्थान मिळवलेले, मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावणारे सर फिरोजशाह मेहता यांचा पूर्णाकृती पुतळा महानगरपालिका मुख्यालयासमोर उभारणीला सोमवारी शंभर वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त (प्रभारी) तथा अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्यासह मान्यवरांनी सकाळी अभिवादन केले.

सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे, प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण) विजय निघोट यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील सर फिरोजशाह मेहता यांचा पूर्णाकृती पुतळा म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि फिरोजशाह मेहता यांच्यातील अतूट नात्याचं प्रतीक आहे. फिरोजशाह मेरवंजी मेहता यांचा जन्म ४ ऑगस्ट १८४५ रोजी मुंबईत झाला. अतिशय तल्लख बुद्धिमत्ता लाभलेले फिरोजशाह मेहता यांनी मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या निर्मितीत सर्वात मोठे योगदान दिले आणि त्याचा पाया रचला. करदात्यांचे प्रतिनिधित्व असणारे नागरी प्रशासन असले पाहिजे, ही त्यांची भूमिका ब्रिटिशांना मान्य करावी लागली आणि लोकप्रतिनिधित्व असणारे नागरी प्रशासन लाभले. फिरोजशाह मेहता यांचे विचार १८७२च्या महानगरपालिका अधिनियमात समाविष्ट करण्यात आले आणि त्यातून नागरी स्वातंत्र्याचे बीजारोपण झाले. अधिनियम बनवणाऱ्या परिषदेचे मेहता हे स्वतः सदस्य होते. नवीन म्युनिसिपल कायद्याच्या चर्चेत ते कायम नागरिकांच्या व करदात्यांच्या बाजूने बोलत. आपली मते ठासून मांडायचे आणि जोरदार युक्तिवाद देखील करायचे.

भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुंबई महानगरपालिका हा मैलाचा दगड मानला जातो तसा मुंबई महानगरपालिका अधिनियम हा देखील आदर्शवत मानला जातो. महानगरपालिकेमध्ये सर फिरोजशाह मेहता यांना सभापती या नात्याने सन १८८४-८५ व १८८५-८६ अशी सलग दोन वर्षे, तर अध्यक्ष या नात्याने सन १९०५-०६ आणि त्यानंतर पुन्हा एकदा १९११-१९१२ अशी दोन वर्षे, असे मिळून एकूण चार वर्षे मुंबई महानगराचा प्रथम नागरिक बनण्याचा बहुमान मिळाला. महानगरपालिकेच्या इतिहासातील हे पहिलेच उदाहरण होते. या सर्व योगदानामुळे फिरोजशाह मेहता यांना ‘मुंबईतील नागरी शासनाचे पिता’ हे सार्थ नाव मिळाले.

सर फिरोजशाह मेहता हे ५ नोव्हेंबर १९१५ रोजी कालवश झाले. त्यानंतर, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर पूर्णाकृती पुतळा उभारला गेला. त्यासाठी सामुदायिक वर्गणीतून ऐंशी हजार रुपयांची वर्गणी संकलित करण्यात आली होती. ३ एप्रिल, १९२३ रोजी या पुतळ्याचे समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले. त्या ऐतिहासिक दिवसाला आज शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.

(हेही वाचा – महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास महाले यांचा दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनतर्फे गौरव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.