हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी पाच ठिकाणी उभारणार केंद्र

103

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधरवण्याच्या दृष्टीकोनातून या गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्यासाठी पाच ठिकाणी केंद्रे पर्यावरण विभागामार्फत स्थापन करण्यात येणार आहे. शिवाजी नगर (देवनार), माहुलगाव (चेंबूर), पंतनगर (घाटकोपर), चारकोप (कांदिवली पश्चिम), वीर जिजामाता भोसले उद्यान (भायखळा) येथे गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सल्ल्यानुसार या केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या केंद्राच्या उभारणीसाठी जेवढा खर्च केला जाणार आहे, त्याच्या ७० ते ८० टक्के रक्कम पुढील पाच वर्षांच्या देखभालीवर खर्च करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः मुंबई महापलिकेत आयुक्त आहेत, की प्रशासक?)

पाच ठिकाणी सर्वेक्षण केंद्र

भारत सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत प्रदूषित शहरातील वायू प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने प्रदूषित शहराचा कृती आराखडा मंजूर केलेला आहे. महाराष्ट्रातील अधिक प्रदूषित असणाऱ्या १७ शहरांमध्ये मुंबई शहराचा समावेश आहे. महापालिकेचा कृती आराखडा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ऑक्टोबर २०१९ मध्ये मंजूर केलेला आहे. यामध्ये शहरातील वाहतूक व्यवस्था, दळणवळण, उद्योगधंदे इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करुन, शहरातील वायू प्रदूषण नियंत्रित करण्याचे नमूद केले आहे. राष्ट्रीय हरित लवाद यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी स्वत: स्वत:च्या अखत्यारितील वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्राची कार्यकक्षा तसेच संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिकेने राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत मुंबईत पाच ठिकाणी स्वयंचलित वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचाः कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च सुमारे १२ कोटींनी होणार कमी)

यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये एनव्हायरोंमेंट एस.ए. इंडिया ही कंपनी पात्र ठरली असून, पाच केंद्रांच्या उभारणीसाठी साडेसहा कोटी रुपये आणि पुढील तीन वर्षांच्या हमी कालावधीनंतर ५ वर्षांच्या देखभालीसाठी ४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या मंजुरीनंतर कार्यादेश प्राप्त झाल्यावर पुढील सहा महिन्यांमध्ये कार्यान्वित करणे बंधनकारक आहे.

स्वयंचलित वायू सर्वेक्षण केंद्र स्थापन करण्यामागील उदि्दष्ट:

  • हवेच्या गुणवत्तेची वर्तमान स्थिती विषयक अचूक माहिती उपलब्ध करुन देणे.
  • मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषण समस्येवर उपाययोजना शोधणे.
  • प्रदूषणासंदर्भात योजना आखण्यास धोरणकर्त्यांना अचूक माहिती उपलब्ध करुन देणे.
  • स्वच्छ व हरित मुंबईचे स्वप्न साकार होण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे.

(हेही वाचाः नगरसेवकांना पडला प्रश्न, कुणासमोर फोडायचे डोकं?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.