क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्षयरोगाची बाधा होण्याची संभाव्यता असते. ही बाब लक्षात घेऊन ‘शस्त्र’ हे भ्रमणध्वनी आधारित वैशिष्ट्यपूर्ण ‘अँड्रॉइड ॲप’ केंद्र सरकारच्या संबंधित विभागाद्वारे तयार करण्यात आले आहे. या ॲपद्वारे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या ५६४ कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ८० टक्के कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली आहे.
सध्या या प्रक्रियेत केवळ क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असून, पुढील टप्प्यात आरोग्य खात्यातील इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश या आधारित चाचणीमध्ये करण्यात येणार आहे.अत्याधुनिक अँड्रॉइड ॲपमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयात न जाता देखील क्षयरोग विषयक प्राथमिक चाचणी घरबसल्या करता येणार आहे.
(हेही वाचाः वरळीच्या पुलाची दुरुस्ती रखडली… एमएसआरडीसी आणि वाहतूक पोलिसांच्या वादात अपघातांना जबाबदार कोण?)
अँड्रॉइड ॲपद्वारे तपासणी
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ‘शस्त्र’ हे भ्रमणध्वनी आधारित अँड्रॉइड ॲप बनवण्यात आले असून, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या आधारे आवाजाचे विश्लेषण करुन क्षयरोग बाधा झाल्याचे प्राथमिक निदान केले जात आहे.या ‘अँड्रॉइड ॲप’चे महत्त्वाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या ॲपद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांचा आवाज व खोकण्याचे ‘रेकॉर्डिंग केले जाते.
असे होते निदान
‘रेकॉर्ड’ करण्यात आलेल्या या आवाजाचे व खोकण्याचे विश्लेषण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित अत्याधुनिक प्रणालीच्या आधारे करण्यात येते. ज्याद्वारे क्षयरोग बाधा झाल्याचे प्राथमिक स्तरावरील निदान होते. या विश्लेषणाच्या आधारे ज्यांना क्षयरोग बाधा झाल्याचे प्राथमिक निदान झाले आहे, अशा व्यक्तींची वैद्यकीय चाचणी करुन बाधा झाल्याबाबतचे अंतिम निदान केले जाते, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.
(हेही वाचाः महापालिकेत संजीवकुमारांचा स्वप्नभंग?)
इतर कर्मचा-यांचाही समावेश करणार
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत मुंबईत ५६४ कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून, यापैकी सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांनी या अँड्रॉइड ॲप आधारित प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे. सध्या या प्रक्रियेत केवळ क्षयरोग विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असून, पुढील टप्प्यात आरोग्य खात्यातील इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश या आधारित चाचणीमध्ये करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
घरबसल्या चाचणी होणार
या अत्याधुनिक अँड्रॉइड ॲपमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रुग्णालयात न जाताही क्षयरोग विषयक प्राथमिक चाचणी घरबसल्या करता येणार आहे. या चाचणीमुळे लवकर निदान झाल्याने लवकर उपचार करणे शक्य होऊन क्षयरोगाची बाधा नष्ट करणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः मंगळवार, बुधवारी कांदिवली, बोरिवली, दहिसर व मालाडमध्ये १०० टक्के पाणीकपात)
Join Our WhatsApp Community