वाढती इंधन दरवाढ आणि बसमुळे होणारे वायु प्रदूषण कमी व्हावे, यासाठी पर्यावरणपूरक वाहने आणि त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र सरकारने मुंबई महापालिकेला 264 कोंटीचा निधी दिला होता. आता तो निधी बेस्ट उपक्रमाकडे देण्यात आला आहे.
अधिक अनुदान दिले जाणार
पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार विविध राज्यांमधील महत्त्वाच्या शहरांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्राकडून निधी उपलब्ध करण्यात येतो. त्याअंतर्गत मुंबई महापालिकेला 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी 264 कोटी रुपये अनुदान दिले आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये केंद्राकडून पालिकेला टप्प्याटप्प्याने 940 कोटी रुपये अनुदान मिळणार आहे.
ताळेबंद द्यावा लागणार
गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाचा आर्थिक तोटा वाढत आहे. त्यामुळे या उपक्रमाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. म्हणून ईलेक्ट्रिक बसगाड्या घेण्यासाठी 264 कोटी रुपये बेस्टच्या तिजोरीत जमा करण्यात आले. या दिलेल्या निधीचा कशा प्रकारे विनियोग करण्यात आला त्याचा ताळेबंद बेस्टला महापालिकेसमोर सादर करावा लागणार आहे. तशा सूचना बेस्ट उपक्रमाला देण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा: जगाच्या उष्ण शहरांच्या यादीत चंद्रपूर पाचव्या दिवशी पडले मागे… पाहा कोण आहे आघाडीवर …)
पुढील वर्षात निम्म्या बसेस इलेक्ट्रिक
- बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या 3 हजार 500 बसगाड्या आहेत
- त्यापैकी 384 बसगाड्या ईलेक्ट्रिक आहेत.
- बेस्ट उपक्रमासमोर ताफ्यात विजेवर धावणा-या बसगाड्यांची संख्या 2023 पर्यंत 50 टक्के, तर 2027 पर्यंत 100 टक्के करण्याचे उद्धिष्ट आहे.