तळीये दुर्घटनाग्रस्तांना पक्की घरे बांधून देणार! नारायण राणेंची मोठी घोषणा

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत त्यांना पक्की घरे बांधून देण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

178

महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पहाणी केली. यावेळी दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर देखील उपस्थित होते.

काय म्हणाले राणे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला दुर्घटनाग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी पाठवले आहे. तळीये गावात दरड कोसळून झालेली ही दुर्घटना भीषण आहे. यात अजूनही बचावकार्य सुरू आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत त्यांना पक्की घरे बांधून देण्यात येतील, अशी घोषणा सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

(हेही वाचाः धक्कादायक! रायगडमध्ये पुन्हा कोसळली दरड!)

केंद्र सरकार करणार मदत

या दुर्घटनेत बेघर झालेल्या गावक-यांसाठी याठिकाणी तात्पुरती वसाहत उभारण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींना येथील परिस्थितीची पूर्ण माहिती दिली जाईल. त्याप्रमाणे केंद्र सरकारडून योग्य ती मदत करण्यात येईल, असेही राणे यांनी सांगितले.

तातडीने मदत मिळण्यासाठी उपाययोजना करणार

कोकणात वारंवार येणा-या पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी कायमस्वरुपी एनडीआरएफची तुकडी कोकणात तैनात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे नारायण राणे यांनी सांगितले. तसेच स्थानिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून प्रांत स्तरावर अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः …म्हणून तळयी गावात बचावपथक वेळेत पोहचले नाही! मुख्यमंत्र्यांनी सांगितले कारण!)

ही आरोप करण्याची वेळ नाही

अशी भीषण दुर्घटना घडेल, हे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. कडा कोसळून असंख्य घरे उद्ध्वस्त होतील, याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे कोणावरही आरोप करण्याची ही वेळ नाही. आज दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याची गरज आहे, त्यामुळे त्याकडे आधी लक्ष देणे गरजेचे आहे, असे नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

म्हाडाने उचलली जबाबदारी

दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये बाधित झालेल्या संपूर्ण तळीये गावाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारल्याची घोषणा, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. कोणालाही अडचण भासू न देण्याचा मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठीची ही सुरुवात आहे. तसेच ही सूचना शरद पवार यांनी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

(हेही वाचाः पुन्हा एकदा कोल्हापूरच्या मदतीला धावली मुंबई महापालिका)

पूरग्रस्त भागातील जीवितहानी

आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 87 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून, अजूनही काही मृतदेह ढिगा-याखाली असल्याचे समजत आहे. एनडीआरएफकडून युद्धपातळीवर काम करण्यात येत असून, मृतदेह शोधण्यात येत आहेत. 24 जुलै रोजी रात्रीपर्यंत राज्यातील पूरग्रस्त भागांतून सुमारे १ लाख ३५ हजार लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. एकूण ११२ मृत्यू झाले असून, ३ हजार २२१ जनावरांचे मृत्यू आहेत. एकंदर ५३ लोक जखमी असून, ९९ लोक बेपत्ता आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.