मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्रवाशांना धक्का देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दादर स्थानकातील फलाट क्रमांक १चे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी या फलाटाला जोडून असलेला फलाट क्रमांक २ शुक्रवार, १५ सप्टेंबरपासून बंद केला जाणार आहे. याचाच अर्थ दादरहून सुटणारी धीमी लोकलसेवा इतिहासजमा होणार आहे. त्यामुळे धीमी ‘दादर लोकल’ पकडणाऱ्या प्रवाशांना आता परळ स्थानक गाठावे लागणार आहे.रुंदीकरणाच्या कामासाठी फलाट क्रमांक २वर येणाऱ्या आणि जाणाऱ्या एकूण २२ लोकल फेऱ्या परळ (Parel) टर्मिनसहून सुटणार आहेत
खरेदी करणाऱ्यांसाठी अनेक लोकांची पसंती दादर (Dadar) स्थानकालाच असते. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गातील सर्व लोकांना आणि पश्चिम रेल्वेमार्गांना जोडणाऱ्या दादर स्थानकाला प्रवाशांची प्रथम प्राधान्य असते. मुंबई तसेच परिसरातील खरेदीदारांसाठीही दादर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. मुंबईच्या लोकल प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच गेली आहे, मात्र त्या प्रमाणात स्थानकांतील प्रवासी सुविधा अद्ययावत झालेल्या नाहीत. यामुळे दादरच्या फलाट क्रमांक १ आणि २वर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. अरुंद फलाटावर प्रवाशांची रेटारेटी आवरताना रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक होते. यामुळे फलाटावरील गर्दी नियोजनासाठी फलाटाच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
का होणार बंद
मध्य रेल्वेवरील दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक १ची लांबी २७० मीटर असून रुंदी ७ मीटर आहे. आता फलाटाची रुंदी साडेतीन मीटरने वाढवून १०.५ मीटर केली जाणार आहे. रुंदीकरणाचे काम शुक्रवारपासून सुरू होणार असून यासाठी एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.रुंदीकरणानंतर फलाट क्रमांक १वर सरकते जिने कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अरुंद फलाटामुळे रखडलेल्या पायऱ्यांची रुंदीदेखील वाढवण्यात येणार आहे. यामुळे फलाटावरील गर्दी विभागणार असून दादर स्थानकातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
(हेही वाचा : ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने महागाई भत्ता मिळणार)
दादर लोकल’ परळ स्थानकातूनच चालवण्यात येणार
फलाट १-२वर दोन पादचारी पूल आहेत. रुंदीकरणाच्या कामासाठी फलाट क्रमांक २वर येणाऱ्या आणि जाणाऱ्या एकूण २२ लोकल फेऱ्या परळ टर्मिनसहून सुटणार आहेत. पुढील सूचनेपर्यंत ‘दादर लोकल’ परळ स्थानकातूनच चालवण्यात येणार आहे.
दादर जलद लोकल मात्र वेळापत्रकाप्रमाणे उपलब्ध राहणार
दादर स्थानकातील अप-डाउन धीम्या लोकल फेऱ्या कायमस्वरूपी परळ स्थानकातून चालविण्यात येणार आहेत. यामुळे दादर लोकल बंद होऊन आता परळ लोकल सुरू होणार आहेत. दादर जलद लोकल मात्र वेळापत्रकाप्रमाणे उपलब्ध राहणार असल्याचे मध्य रेल्वे च्या वतीने सांगण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community