लोकल सुरु करण्याचा निर्णय जरी अद्याप झालेला नसला तरी आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवास सुरु होणार आहे. मध्य रेल्वेने जारी केलेल्या एका पत्रामधून ही गोष्ट उघड झाली आहे. त्यासाठी उद्यापासून रेल्वेचे बुकिंग सुरू केले जाणार आहे.
उद्यापासून आरक्षण सुरु
राज्यात काल मिशन बिगीन अगेनची नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. त्याला अनुसरून मध्य रेल्वेने उद्यापासून रेल्वेचे आरक्षण देखील सुरू केले आहे. भारतीय रेल्वेवर सध्या ज्या २०० स्पेशल गाड्या धावत आहेत, त्याच गाड्यांमध्ये या नवीन नियमानुसार प्रवास करता येणार आहे. रेल्वे पूर्णतः सुरू करण्यात येणार नाही, या २०० रेल्वे गाड्यांचा सोबत ज्या स्पेशल राजधानी एक्सप्रेस चालवल्या जात आहेत त्यामध्ये देखील प्रवास करता येणार आहे. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध उठवण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली होती. राज्याच्या ग्रामीण भागांतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ई-पास रद्द करू नये, असा सरकारमध्ये एक मतप्रवाह होता. फक्त खासगी प्रवासासाठी ई-पासची अट होती. ती रद्द करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. नागरिकांची नाराजी लक्षात घेता ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आता एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात आता सहज प्रवास करता येईल.
काय आहे नव्या नियमावलीत
- हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार.
- शाळा आणि कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार.
- 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही.
- खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा.
- सिनेमागृह 30 सप्टेंबरपर्यंत राहणार बंद.
- मंदिर आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही
- सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थेटर्स आणि बिअर बारवरील बंदी कायम
- संस्कृतिक, सामाजिक, क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातले कार्यक्रम तसेच मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र येता येणार नाही
- आवश्यक सेवेतील सर्व दुकाने आधीच या नियमावलीचे पालन करतील
- प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा