मध्य रेल्वेवरील नव्या 10 एसी लोकल रद्द, मध्य रेल्वेचा निर्णय

109

मध्य रेल्वेवर नव्यानं सुरू करण्यात आलेल्या 10 एसी लोकल बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांनी केलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेकडून आपला निर्णय मागे घेण्यात आला आहे. कळवा, बदलापूर येथील नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर विधीमंडळाच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एसी लोकल रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने वाढीव एसी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

10 फे-या रद्द

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधत मध्य रेल्वेकडून एसी लोकलच्या 10 नव्या फे-या वाढवण्यात आल्या होत्या. यामध्ये सीएसएमटी ते बदलापूर दरम्यान 4, ठाणे ते सीएसएमटी दरम्यान 4 तर कल्याण ते सीएसएमटी दरम्यान 2 फे-या वाढवण्यात आल्या होत्या. या नव्या फे-यांविरोधात मध्य रेल्वेच्या प्रवाशांमध्ये नाराजी होती. कळवा येथील नागरिकांनी आंदोलन करत कारशेडमधून सुटणारी ट्रेन अडवली होती. त्यानंतर बदलापूर येथील नागरिकांनीही आंदोलन केले होते.

नागरिकांच्या या तक्रारीनंतर अधिवेशनातही जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उचलून धरला. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने वाढीव 10 एसी लोकल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या 56 एसी लोकल याआधी मध्य रेल्वेवर सुरू होत्या त्या मात्र तशाच सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.