कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबईत सर्वसामांन्यांसाठी लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. अजूनही राज्य सरकारने लोकल सुरू करण्यास परवानगी दिली नसल्याने, कोरोनाची लस घेण्यासाठीही लोकांना बाहेर जाता येत नाही. मात्र आता कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांना लोकल प्रवास करण्याची मुभा मिळाली असून, मध्य रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. नागरिकांना लोकलचे तिकीट घेण्यासाठी मोबाईलवरील कोरोना लस कुठे घेत आहे, किती वाजता घेतली जाणार आहे, याची माहिती दाखवणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरील लोकलमधूनच प्रवास करण्याची अनुमती आहे.
म्हणून मरेने घेतला निर्णय
लोकल बंद असल्याने अनेकांना कोरोना लस घेण्यासाठी देखील दुसऱ्या ठिकाणी जाता येत नव्हते. नागरिकांकडून राहत्या घराच्या जवळच्या ठिकाणी कोरोना लसीसाठी नोंदणी केली जात होती. मात्र, अनेकदा त्या ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा किंवा अन्य कारणाने काही काळ लसीकरण केंद्र बंद होते. त्यामुळे अनेक जण ज्याठिकाणी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील, अशा केंद्रांत नोंदणी करतात. तर, काही जण कामाला जाण्याच्या ठिकाणा जवळील लसीकरण केंद्रात नोंद करतात. त्यामुळे याठिकाणी जाण्यासाठी लोकलचा पर्याय उत्तम असल्याने नागरिकांनी लोकलचा प्रवास देण्याची मागणी, तक्रारी केल्या होत्या. रेल्वेच्या ट्विटर खात्यावर अनेकांनी यासंदर्भात तक्रारी, विचारणा केली होती. त्यानंतर रेल्वेकडून तक्रारकर्त्यांना लोकल प्रवास करता येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, यासाठी लसीकरणासंबंधी कागदपत्रे असणे आवश्यक असल्याचे सांगितले.
(हेही वाचाः 15 दिवसांत लोकल प्रवाशांची संख्या पोहोचली 31 लाखांवर!)
परे कधी घेणार निर्णय?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकीकडे मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला असताना पश्चिम रेल्वेने मात्र अद्याप तसा कोणताच निर्णय घेतला नाही. राज्य सरकारने दिलेल्या कॅटेगरीमधील प्रवाशांना लोकल प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे. यात अन्य कोणत्याही कॅटेगरी सामील केल्या नाहीत. तसेच अद्याप कोणत्याही प्रवाशाने कोरोना लस घेण्यासाठी लोकल प्रवास करण्याची विचारणा पश्चिम रेल्वेकडे केली नाही. त्यामुळे अजून यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. येत्या दिवसांत प्रवाशांकडून याविषयी विचारणा केल्यास योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Communityज्या नागरिकांना कोरोनाची लस घ्यायची आहे, अशा नागरिकांना लोकल प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ज्यादिवशी लसीकरण असेल, त्याच दिवसाचे तिकीट दिले जाईल.
-ए. के. जैन, मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी