कोरोना काळात सामान्य लोकांना रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतात बहुतांशा खासगी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा सुरू केली. कामांच्या वेळेतील बदलांमुळे उपनगरीय रेल्वेप्रवाशांची संख्या कमी झाली आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सुद्धा मध्य रेल्वे १५ लाख लोकांच्या प्रतीक्षेत आहे. कोरोना पूर्व काळात मध्य रेल्वेची रोजची प्रवासी संख्या ४५ लाख होती सध्या हीच संख्या ३५ लाख एवढी झाली आहे. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेची प्रवासी संख्या ३० लाख एवढी झाली आहे. मुंबईत उद्भवणाऱ्या पावसाळ्यातील अडचणी आणि कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा अंदाज यामुळे प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता तूर्त कमी असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
( हेही वाचा : 7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात फिटमेंट फॅक्टरमुळे होणार वाढ)
बदललेल्या कार्यपद्धतीमुळे रेल्वे प्रवासीसंख्या कमी
शहर, उपनगरांमधील खासगी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास मुभा दिली होती. मात्र या बदललेल्या कार्यपद्धतीमुळे रेल्वे प्रवासीसंख्या कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत कमी झालेली आहे. प्रवासी संख्या कमी असतानाही रेल्वेकडून साध्या आणि वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत.
पावसाळ्याच्या धर्तीवर स्थानकांमध्ये अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. रेल्वे स्थानकांतील पादचारी पूल, सरकते जिने, फलाट हे पावसाळ्यात निसरडे होतात. अशा स्थितीत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. म्हणूनच अनेक लोक सोयीस्कर प्रवासासाठी खासगी वाहने किंवा बस वाहतुकीचा पर्याय निवडतात. पावसाळ्याच्या नियोजनासाठी रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस यांचीही मदत घेण्यात येत आहे, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.