मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये सामान्य डब्यांमध्ये गर्दी असल्याने, अपंग प्रवाशांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात सर्वसामान्य प्रवाशी तर घुसखोरी करतच आहेत, पण धक्कादायक बाब म्हणजे या अपंग प्रवाशांच्या डब्यातून लोहमार्ग पोलीस कर्मचारीही प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या संदर्भात वारंवार तक्रारी करुन आणि पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करुनही परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे या डब्यांतून प्रवास करणा-या अपंग प्रवाशांची कुचंबणा होत आहे.
पोलीस कर्मचारीही करतात प्रवास
लोकलमध्ये अपंगांसाठी आरक्षित डब्यांमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. मात्र लोकल गाडयांमध्ये होणा-या गर्दीमुळे सामान्य प्रवासी सर्रास अपंगांच्या डब्यात घुसखोरी करतात आणि अपंग प्रवाशांनी हटकल्यास अरेरावीची भाषा केली जाते. याविरोधात रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासनिकांकडूनही वेळोवेळी कारवाई केली जाते. पण, तरीही त्याचा परिणाम होताना दिसत नाही. एवढचं नाही तर, अपंगांसाठीच्या डब्ब्यांतून लोहमार्ग पोलीस कर्मचारीही प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे.
( हेही वाचा :…म्हणून फ्रंटलाईन वर्कर बूस्टर डोसपासून वंचित )
विकलांग डब्यातून प्रवास करु नका
निर्धार विकलांग विकास सामाजिक संघाने ही बाब रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलीस आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यानंतर लोहमार्ग पोलीस आयुक्त कार्यालयाने सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विकलांग डब्यातून अनधिकृतरित्या प्रवास करु नये अशा सूचना केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community