लोकलमधील महिला डब्यात छेडछाडीसह इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे मंडळाने सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा जून अखेरपर्यंत सर्व महिला डब्यांत बसण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांचा रेल्वे डब्यात आता कडेकोट बंदोबस्त असेल. मुंबई उपनगरी रेल्वेतील महिला प्रवाशांचा प्रवास जूननंतर आधुनिक सुरक्षिततेत असेल.
रेल्वे पोलिसांच्या महासंचालक कार्यालयाने रेल्वेच्या महिला प्रवाशांच्या डब्यांचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सुमारे ५९ टक्के महिला प्रवाशांनी रेल्वे डब्यात खाकी गणवेशातील पोलीस तैनात करण्याच्या पारंपरिक पद्धतीच्या जोडीलाच महिला डब्यात सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा कार्यान्वित करून आधुनिक सुरक्षा प्राधान्याने पुरवावी, असा अभिप्राय नोंदवला होता.
रेल्वे मंडळाने लोकलमधील महिलांच्या डब्यात छेडछाडीसह अन्य गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा सर्व महिला डब्यांत बसवण्याच्या सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिल्या आहेत. जूनअखेरपर्यंत महिला डब्यात सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
५९४ महिला डब्यांत टॉकबॅक यंत्रणा कार्यान्वित
आपत्कालीन स्थितीत महिलांना तातडीने मदत मिळावी, यासाठी लोकलच्या गार्डशी संवाद साधता यावा, या उद्देशाने टॉकबॅक यंत्रणा बसवण्याची सूचना करण्यात आली आहे. लोकलमधील ५९४ महिला डब्यांत टॉकबॅक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ३० जूनअखेर सर्व महिला डब्यांत टॉकबॅक यंत्रणा सुरू होणार आहे. यंत्रणेतील बटण दाबल्यानंतर गार्डशी संवाद साधून योग्य ती मदत महिला प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. यामुळे संकटाच्या वेळी महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महिला प्रवाशांच्या सर्वेक्षणानंतर उपाययोजना
मुंबई रेल्वे पोलिसांचा १५१२ हेल्पलाइन क्रमांक लोकलमध्ये ठळकपणे दिसेल, अशा ठिकाणी रेखाटण्यात आला आहे. रेल्वे पोलिस महासंचालकाच्या सर्वेक्षणात जवळपास तीन हजार महिलांनी सहभाग घेतला होता. रेल्वेतील ३७ टक्के गुन्हे हे लोकलच्या डब्यात होतात. त्यामुळे रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी ५९ टक्के महिला प्रवाशांनी लोकल डब्यांसह पादचारी पूल, तिकीट खिडकी या परिसरांत सीसीटीव्ही व टॉकबॅक यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना केली होती. ७७१पैकी ६०६ डब्यांमध्ये सीसीटीव्ही, ५९४ डब्यांत टॉकबॅक कार्यन्वित करण्यात आले असून उर्वरित महिला डब्यांमध्ये लवकरच ही सेवा कार्यान्वित होणार आहे.
सुरक्षेमध्ये आवश्यकतेनुसार बदल
महिला रेल्वे प्रवाशांच्या सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल मध्य आणि पश्चिम रेल्वेसह रेल्वे सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. अहवालानुसार, महिला डब्यातील सध्याच्या सुरक्षेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल. मुंबई रेल्वे पोलिस आयुक्तालय आणि विभागीय रेल्वे अधिकारी यांच्या बैठका घेऊन आवश्यकतेनुसार सुरक्षेत बदल करण्यात येतील. रेल्वे पोलिस ठाण्यांच्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, असे रेल्वे पोलिस महासंचालक कार्यालयातून सांगण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community