कामानिमित्त अनेक महिला प्रवासी आपल्या लहान बाळाला घेऊन प्रवास करतात. अशा सर्व महिला प्रवाशांना येत्या वर्षात दिलासा मिळणार आहे. रेल्वेस्थानकात बाळाला स्तनपान करणे मातांना शक्य व्हावे यासाठी मध्य रेल्वेकडून ९ स्थानकांमध्ये १७ ठिकाणी ‘ममता कक्ष’ उभारण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : बेस्ट वातानुकूलित बसला भीषण आग, पहा व्हिडिओ… )
महिला प्रवाशांसाठी ममता कक्ष सुरू करण्याचा निर्णय
लहान बाळासह प्रवास करणाऱ्या मातांची गर्दीच्या ठिकाणी किंवा रेल्वेस्थानकांवर मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. महिला वर्गाची स्वच्छतागृहांमधील दुर्गंधीमुळे अडचण होते या स्वच्छतागृहांची अवस्था फारशी चांगली नसल्यामुळे अनेक स्तनदा मातांनी याविषयी तक्रार केली होती. या तक्रारी रेल्वेला प्राप्त झाल्यानंतर आता मध्य रेल्वेने महिला प्रवाशांसाठी ममता कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, लोणावळा, पनवेल, ठाणे या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकामध्ये एकूण १३ ममता कक्ष उभारण्यात येणार आहेत. नॉन फेअर रेव्ह्युन्यूअंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्तनदा मातांसाठी ४ कक्ष जानेवारी २०२३ अखेर पर्यंत खुले करण्यात येणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई विमानतळावर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत तसेच एसटी स्थानक आणि आगारतही हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हे कक्ष हवेशीर असून यात शुद्ध पाणी, टेबल-खुर्ची अशी व्यवस्था आहे.
या स्थानकांवर ममता कक्ष
- सीएसएमटी
- लोकमान्य टिळक टर्मिनस
- ठाणे
- दादर
- कल्याण
- लोणावळा
- पनवेल
- मुलुंड
- चेंबूर