पावसाळ्यात घाट विभागांवर लक्ष ठेवण्यासाठी मध्य रेल्वे २४ तास कार्यरत!

पावसाळ्यात उपनगरी आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या सुरळीत आणि विनाव्यत्यय प्रवासासाठी मध्य रेल्वेने घाट विभागांच्या पाहणीची तयारी सुरू केली आहे. मान्सूनचा सामना करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांपैकी दक्षिण- पूर्वेकडील घाट विभाग म्हणजेच कर्जत-लोणावळा विभाग आणि ईशान्येकडील म्हणजे कसारा – इगतपुरी घाट विभागांच्या सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे.

( हेही वाचा : Google Pay हे अ‍ॅप ओपन न करताच पूर्ण होईल तुमचे पेमेंट; काय आहे हे नवे फिचर)

गाड्या विस्कळीत होऊ शकतात

अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी कल्याण- लोणावळा विभागाची पाहणी केली आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व उपाययोजना पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून रेल्वे गाड्या कोणत्याही अडथळ्याशिवाय धावतील. त्यांनी घाट विभागातील मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला आणि सांगितले की, रेल्वेचा घाट विभाग अनपेक्षित दरड कोसळण्याच्या आणि लॅंडस्लाइडच्या घटनांमुळे असुरक्षित आहे. ज्यामुळे गाड्या विस्कळीत होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही अत्यावश्यक परिस्थितीत, लवकरात लवकर केलेले उपाय वाहतूक पूर्ववत करण्यास मदत करतील .

अशा कोणत्याही घटना रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणेच लॅंडस्लाइड होण्याच्या असुरक्षित ठिकाणी एकूण १४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आखली आहे. यापैकी ८७ सीसीटीव्ही कॅमेरे दक्षिण- पूर्व म्हणजे कर्जत – लोणावळा विभागातील १९ असुरक्षित ठिकाणी तर ५८ सीसीटीव्ही कॅमेरे ईशान्येकडील म्हणजे कसारा – इगतपुरी विभागात ११ संवेदनशील ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. समर्पित आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या टीमद्वारे या सीसीटीव्हीचे 24×7 निरीक्षण केले जाईल. हे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे नियंत्रण कार्यालय चोवीस तास कार्यरत

याशिवाय घाट विभागात ५९४ नग बोल्डरचे स्कॅनिंग आणि ड्रॉपिंगचे काम हाती घेण्यात आले असून, लवकरच हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जाळीच्या कामांबरोबरच लॅंडस्लाइड होऊ नये यासाठी खडकांचे अडथळे आणि टनेल पोर्टलची कामेही घाट विभागात हाती घेण्यात आली आहेत. मध्य रेल्वे नियंत्रण कार्यालय चोवीस तास कार्यरत असून हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्त कर्मचाऱ्यांशी सतत देखरेख आणि संपर्क ठेवेल. असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here