मुंबईतील ‘या’ साथीची केंद्रातून दखल

161

मुंबईत एफ-उत्तर, एच-पूर्व, एल, एम-पूर्व तसेच पी-उत्तर या विभागात पाच वर्षांपर्यंत मुलांमध्ये गोवरची साथ आढळून आली आहे. यात एका लहान मुलाचा मृत्यूही झाला आहे. मुंबईत गोवरची साथ पसरत असल्याची दखल घेत केंद्राचे विशेष पथक मुंबईत दाखल होणार आहे. वाढत्या केसेसबद्दल राज्य आरोग्य विभागाकडून होणारे नियंत्रण कार्यक्रम तसेच कन्टेन्टमेंट विभागाबाबत विशेष पथक मदत करेल. या पथकामध्ये राष्ट्रीय आजार नियंत्रण केंद्र, लॅडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय, कुटुंब व कल्याण विभागाचे पुणे शाखेतील अधिकाऱ्यांचा समावेश असेल. या टीमचे नेतृत्व आजार नियंत्रण कार्यक्रमाचे उपसंचालक डॉ. अनुभव श्रीवास्तव करतील.

पाच विभागांत लहान मुलांमध्ये गोवरची साथ आढळून आल्यानंतर महानगरपालिकेनेही घरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी सुरु केल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाकडून दिली गेली. सर्व्हेक्षणात दहा टक्के बालके गोवर प्रतिबंधक लस अर्धवट घेतलेली आढळून आली. तर २५ टक्के बालकांनी प्रतिबंधात्मक लसीकरण घेतलेले नाही. याबाबत माहिती मिळताच दिल्ली तसेच पुण्यातून दाखल विशेष पथक दाखल होत आहे. या पथकामध्ये तिन्ही विभागातील केवळ तीन सदस्यांचा समावेश असेल. रुग्ण आढळून आलेल्या विभागांतही टीम भेट देईल. मुंबईत वाढत असलेल्या केसेस नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाला टीम मदत करेल.

गोवर या आजाराबाबत –

  • गोवर या आजारात लहान मुलांमध्ये सर्दी, खोसला व अंगावर लालसर पुरळ येतात.
  • अर्धवट व लसीकरण न झालेल्या बालकांमध्ये या आजारामुळे होणारी गुंतागुंत गंभीर स्वरुपाची होऊ शकते. यात फुफ्फुसाचा दाह, अतिसार, मेंदूचा संसर्गही होण्याची भीती आहे.

गोवरच्या लसीकरणाबाबत –

गोवर तसेच रुबेला या आजाराची पहिली मात्रा बालकाला ९ महिने पूर्ण झाल्यावर व दुसरी मात्रा १६ महिने पूर्ण झाल्यानंतर दिली जाते. या दोन्ही मात्रा पालिकेच्या आरोग्य केंद्र, दवाखाने, रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांत मोफत उपलब्ध आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.