मुंबईत सध्या लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पण लसीचा दुसरा डोस न घेताच नागरिकांना दुसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, कोविडच्या मोबाइल ॲपवर प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर दुसरी लस घेतल्याची नोंद नाही, किंबहुना तशी लसही घेतलेली नसताना हे प्रमाणपत्र मिळाल्याने नागरिकांना मोठा धक्काच बसला आहे. जर अशी प्रमाणपत्रे दिली गेली तर लसीकरणाचा हेतूच साध्य होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
महापौरांनी केली पाहणी
घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात लसीकरणाचा दुसरा डोस न घेता प्रमाणपत्र प्राप्त होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी लसीकरण केंद्राला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. यावेळी आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, “एन” विभाग प्रभाग समिती अध्यक्षा स्नेहल मोरे, एन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी, राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका विद्या ठाकूर उपस्थित होत्या.
(हेही वाचाः घोषणा केंद्राची पण महाालिकेने उचलला भार… ५४ मृतांच्या कुटुंबांना दिली ५० लाखांची मदत!)
तांत्रिक चूक?
व्यक्तीने लसीचा डोस न घेता प्रमाणपत्र कशा पद्धतीने वितरित झाले, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून महापौरांनी जाणून घेतली. डोस न घेता अशा पद्धतीने प्रमाणपत्र वितरित होणे ही चुकीची बाब आहे. संगणकावर संपूर्ण ॲपची प्रक्रिया समजून घेतली असता ही बाब लक्षात येते. पण याठिकाणी संगणकासोबतच लेखी नोंद सुद्धा घेण्यात येत असून, संबंधित व्यक्तीची लेखी नोंदच नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. जेणेकरुन या व्यक्तीने लसीकरणाचा दुसरा डोस घेतला नाही, हे यातून स्पष्ट होते. ही तांत्रिक चूक आहे की नाही? हे सद्यस्थितीत सांगू शकता येत नसून, यामुळे अनेक जण लसीकरणाच्या दुस-या डोसपासून वंचित राहू नये, असे मत महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. अशाप्रकारे ॲपद्वारे प्रमाणपत्र प्राप्त होणे ही गंभीर बाब असून, याबाबत संबंधित वैद्यकीय अधीक्षकांनी महापालिका आयुक्तांना लेखी कळवावे, असे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community