सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

157

सप्टेंबर महिन्यातही मान्सून सक्रिय राहणार आहे, एवढंच नाही तर देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून हंगामाच्या अखेरच्या महिन्यात देशभरात १०९ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वायव्य भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या मध्यानंतर सुरू होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

( हेही वाचा : रेल्वेत चोरांचा सुळसुळाट; ५ दिवसात १६९ मोबाईल लंपास )

सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता

हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी १६७.९ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा अंदाज विचारात घेता राज्याच्या सर्वच भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यातही कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात ला-निना स्थिती वर्षाअखेरीपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, इंडियन ओशन डायपोल (आयओडी) नकारात्मक राहण्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.