सप्टेंबर महिन्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे.गेल्या आठवड्यातही मुसळधार पाऊस पडला, मात्र येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून, गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
मुंबईत पुढील तीन ते चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 14-15 सप्टेंबरदरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे 16 सप्टेंबरनंतर मुसळधार पाऊस पडू शकतो.
येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा
येत्या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 48 तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोणत्या जिल्ह्यात पाऊस
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, तर मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये हलका पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.