मुंबईत मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या वाढत असून, पुढील आठ दिवस मुंबईकरांसाठी धोक्याचे मानले जात आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवसांमध्ये रुग्ण वाढीचा चढता आलेख राहिल्यास मुंबईत संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, पुन्हा लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गौरी-गणपतीनंतर मुंबईत कडक निर्बंध लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मुंबईत रुग्णसंख्येचा चढता आलेख
मुंबईत १६ ऑगस्ट २०२१ पासून टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार खुले करण्यात आले. तेव्हापासून पुढील १४ दिवसांमध्ये जास्त रुग्ण आढळून आले नसले, तरी त्यानंतर मुंबईतील रुग्णसंख्या वाढतच आहे. मुंबईत तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती वर्तवली जात असतानाच सरासरी २५० ते ३००च्या आत असणारी रुग्णसंख्या ४०० पार केली आहे. त्यामुळे असाच जर रुग्ण संख्येचा आकडा वाढत राहिला, तर मुंबईत तिसरी लाट आल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे पुढील आठ दिवस महत्वाचे मानले जात आहेत.
(हेही वाचाः कशी येणार मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? वाचा…)
प्रशासनातर्फे आवाहन
यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त(आरोग्य)सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी रुग्ण संख्या वाढलेलीच दिसत आहे, पुढील आठ दिवसांत किती रुग्णसंख्या वाढते, यावर सर्व अवलंबून आहे. जर अशीच रुग्ण संख्येची वाढ होत राहिली तर तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असे मानता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ही रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास कडक निर्बंध आणावे लागतील. त्यामुळे गणेशोत्सवात प्रत्येक नागरिकांना विशेष काळजी घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community