गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग हे कोरोनासारख्या भयानक आजाराशी झुंजत आहे. भारतातही या आजाराने थैमान घातले असताना, आता कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. पण भारताच्या शेजारील देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथे पोलिओचे रुग्ण वाढल्याची माहिती मिळत आहे.
अमेरिका आणि युरोपातही धोक्याची घंटा
अफगाणिस्तानातील यादवी युद्ध आणि पाकिस्तानात आलेला महापूर यांमुळे या दोन्ही देशांत पोलिओबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. पोलिओचा प्रसार झपाट्याने होत असल्यामुळे याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका आणि युरोपमध्येही पोलिओचा धोका वाढू लागला असून, न्यूयॉर्कमध्ये हा विषाणू आढळल्यानंतर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या तीन जिल्ह्यांच्या(काउंटी) सांडपाण्यात पोलिओचा व्हायरस आढळून आला. जूनमध्ये लंडनमध्ये देखील सांडपाण्यात पोलिओचा विषाणू आढळून आला होता. त्यामुळे ही एक धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे.
(हेही वाचाः लम्पीनंतर राजस्थानात घोड्यांमध्ये आढळला ‘हा’ भयंकर आजार, माणसांनाही आहे धोका?)
म्हणून भारतातही प्रसार होण्याची शक्यता
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथेही सांडपाण्यात पोलिओचे विषाणू आढळून आले आहेत. पाकमध्ये 25 ऑक्टोबरपर्यंत पोलिओचे 20, तर अफगाणिस्तानात 2 रुग्ण आढळून आले आहेत. या दोन्ही देशांतून राजकीय आणि नैसर्गिक आपत्तींमुळे भारतात होणारे स्थलांतर वाढले आहे. त्यामुळे भारतातही या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका संभवतो, असे राष्ट्रीय पोलिओ प्लस समिती, रोटरीचे अध्यक्ष दीपक कपूर यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community