मुंबईतील दुकानांच्या पाट्या देवनागरी भाषेत अर्थात मराठी भाषेत करण्यासाठी सर्व दुकानदार आणि व्यावसायिकांना आजवर देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आल्यानंतर सोमवारपासून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे. महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या माध्यमातून सर्व दुकानांची प्रत्यक्ष पाहणी करत मराठी नामफलक नसेल तर हातोहात नोटीस पाठवून सात दिवसांमध्ये फलक बसवण्याची एक संधी दिली जाणार आहे. मात्र, या कालावधीतही दुकानदारांनी नामफलक देवनागरी भाषेत न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
पुढील १५ दिवसांत सर्व्हे
मुंबईतील मराठी नामफलकासाठी मद्य विक्रीची दुकाने व मद्य पुरविण्यात येणाऱ्या आस्थापनांव्यतिरिक्त इतर दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. जर ३१ मे पर्यंत या पाट्या मराठीतून न केल्यास पुढील १५ दिवसांत सर्व्हे करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. व्यावसायिकांच्या मागणीनंतर ही मुदत वाढवून देत ३० जून २०२२ पर्यंत करण्यात आली होती, परंतु त्यानंतर ही मुदतवाढ दुकानदार आणि व्यावसायिकांच्या विनंतीनंतर ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे.
(हेही वाचा डेंग्यूच्या आजाराची काळजी घेण्यासाठी महापालिकेने बनवले मोबाईल ॲप)
९७ हजार दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत
त्यामुळे ३० सप्टेंबरची मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेच्यावतीने काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु दहा दिवसांनी म्हणजे सोमवार १० सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईतील २४ विभागांच्या कार्यालयातील दुकाने व आस्थापने विभागाच्या माध्यमातून कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. यापूर्वी मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या निरिक्षकांनी केलेल्या सर्वेमध्ये मुंबईतील एकूण २ लाख दुकानांच्या पाट्यांपैकी केवळ ४८ टक्के म्हणजे ९७ हजार दुकानांच्या पाट्या या मराठी भाषेत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा प्रत्यक्ष दुकानांची पाहणी करण्यास सुरुवात झालेली असून ज्या दुकानांचे नामफलक नियमानांनुसार मराठी भाषेत नाही, अशा दुकानदारांना पाहणीदरम्यान नोटीस दिली जाण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार काही दुकानदारांना नोटीस देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे पुढील सात दिवसांनी नोटीसनुसार कार्यवाही न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होऊ शकते. यासंदर्भात उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मराठी पाट्या करण्यासाठी दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर सोमवारपासून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष दुकानांची पाहणी करून, जिथे मराठी नामफलक दिसून येणार नाही, त्यांना हातोहात नोटीस देणार आहेत. सोमवारपासून या कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे. जर या नोटीसनुसार पुढील सात दिवसांमध्ये दुकानदाराने मराठीत नामफलक न लावल्यास त्यांच्यावर नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
Join Our WhatsApp Community