महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होत असलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत अंशतः बदल करण्यात आला आहे. बारावीच्या व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर एक आणि दोन विषयांच्या ६, १० आणि १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून सुधारित वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.
( हेही वाचा : फिरायला जाताय? ‘या’ भागातील पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू)
पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
राज्य मंडळामार्फत २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा होत आहे. या परीक्षेस श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी हे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणारी ‘एमएचटी सीईटी’ परीक्षाही देणार आहेत. त्यामुळे त्या कालावधीत होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या वेळापत्रकातील अंशतः बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक आणि अन्य घटकांनी नोंद घ्यावी. या तारखेबाबतचे सुधारित वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर एक ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.