मुंबईतून रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना हद्दपार करण्याचा डाव?

143

मुंबईसमोर जेव्हा पाण्याचे संकट उभे राहते, तेव्हा महापालिकेसह लोकप्रतिनिधींना वर्षा जलसंचयन(रेन वॉटर हार्वेस्टिंग), सांडपाणी प्रक्रिया आदींची आठवण होते. परंतु मुंबईमध्ये जिथे ३०० चौरस मीटर व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या जागेवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक होते, तो नियम आता बदलून चक्क ५०० चौरस मीटर व त्यापेक्षा अधिक जागेवर बांधकाम केल्यास याची उभारणी करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत आता ५०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या आतील भूखंडावरील विकासात रेन वॉटर हार्वेस्टिंग होणार नाही. मुंबईत आधी विहिरी बुजवल्या, त्यानंतर या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून आता योजनेच्या अटींमध्ये सुधारणा करत बट्ट्याबोळ केला जात आहे.

काय आहे पूर्वीची अधिसूचना?

मुंबई महापालिकेने शासनाच्या निर्देशानुसार मार्च २००५ मध्ये नवीन इमारत बांधकाम प्रकल्पाला मंजुरी देताना १ हजार चौरस मीटरच्या जागेवर रेन वॉटर हार्वेस्टिंग राबवण्याची सक्ती करुन परवानगी देण्यात येत होती. परंतु पुढे दोन वर्षांनी या अटींमध्ये बदल करण्यात आला. राज्य शासनाने अधिसूचना जारी करुन सुधारित अटींचा समावेश केला. ज्यामध्ये त्यांनी जून  २००७ मध्ये गावठाण व्यतिरिक्त ३०० चौरस मीटर व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडाचा विकास तथा पुनर्विकास करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना बंधनकारक करण्यात येत असल्याचे नमूद केले. त्यामुळे या अधिसूचनेनुसार मुंबईत ३०० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या कोणत्याही बांधकामांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली जात आहे.

(हेही वाचाः आरोग्य अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्तावही महापौरांनी रोखला)

असा आहे नवा नियम

परंतु आता याही अटींमध्ये पुन्हा सुधारणा करण्यात आली आहे. २००७ मध्ये काढलेल्या अधिसूचनेत बदल करत सध्याच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मधील अधिनियम ६२ अन्वये ५०० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडाचा विकास तथा पुनर्विकासाला मंजुरी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची योजना राबवणे बंधनकारक आहे.

इमारतीला ओसी कधी दिली जाते?

इमारत प्रस्ताव विभागामार्फत पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र(फुल ओसी) देण्यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना पूर्ण झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र, हे रेन वॉटर हार्वेस्टिंग सल्लागारांनी सादर करणे बंधनकारक आहे. सल्लागाराकडून हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच इमारतीला ओसी प्रमाणपत्र दिले जाते. मा़त्र, त्यानंतर ही योजना कार्यरत ठेवण्याची जबाबदारी विकासक, मालक आणि रहिवाशांची असते, असे महापालिकेने स्पष्ट केले.

(हेही वाचाः अभियंत्यांना उल्लू बनाविंग)

६ जून २००७ ते ३१ मे २०२१ या कालावधीतील उपनगरांमधील रेन वॉटर हार्वेस्टिंग

वांद्रे ते अंधेरी : ८७७

गोरेगाव ते दहिसर : ८६४

कुर्ला ते मुलुंड : ११००

यापूर्वी १ हजार चौरस मीटर आणि त्यानंतर ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेचा विकास करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक होती. परंतु ३०० चौरस मीटरच्या जागेमध्ये ही योजना राबवणे कठीण होत होते. तसेच त्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे नगरविकास खात्याने यात सुधारणा करुन २०३४च्या विकास आराखड्यातील विकास नियंत्रण नियमावलीत ५०० चौरस मीटरच्या बांधकामात रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले आहे. या ५०० चौरस मीटरच्या जागेत योग्यप्रकारे रेनवॉटर हार्वेस्टिंगचे बांधकाम करता येईल. जे ३०० चौरस मीटरच्या जागेत उभारण्यास अडचणी  निर्माण होत होत्या.

 

-विनोद चिठोरे, प्रमुख अभियंता, महापालिका

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.