महापालिकेचे उपायुक्त (शिक्षण) केशव उबाळे हे नियम वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडील शिक्षण विभागाची जबाबदारी आता सनदी अधिकारी असलेल्या सहआयुक्त अजित कुंभार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कुंभार यांच्याकडून शिक्षण विभागाची जबाबदारी काढून उबाळे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु त्यांच्या निवृत्तीनंतर या विभागाचा अतिरिक्त कार्यभार कुंभार यांच्याकडे सोपवून पुन्हा एकदा शिक्षण विभागाची घडी बसवण्याचा विचार प्रशासनाने केला आहे.
केशव विश्वनाथ उबाळे, उपआयुक्त (शिक्षण) हे २८ फेब्रुवारी २०२३ पासूनच्या नियत वयोमानानुसारच्या सेवानिवृत्त झाल्यामुळे प्रशासकीय निर्णयामुळे ०१ मार्च २०२३ पासून या रिक्त होणाऱ्या ‘उपआयुक्त (शिक्षण)’ या पदाचा अतिरिक्त कार्यभार सहआयुक्त (दक्षता) अजित कुंभार, यांच्याकडे त्यांच्याकडील कामकाजाव्यतिरिक्त अतिरिक्त कामकाज म्हणून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत सोपविण्यात येत असल्याचे आदेश आयुक्तांनी जारी केले आहे.
केशव उबाळे यांनी सहायक आयुक्त म्हणून जी/दक्षिण, एफ उत्तर विभाग, मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त आणि उपायुक्त (मालमत्ता) आणि उपायुक्त (शिक्षण) या विभागांची जबाबदारी सांभाळली होती. नाशिकचे आयुक्तपदी रमेश पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर मालमत्ता विभागाच्या उपायुक्त म्हणून उबाळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु रमेश पवार पुन्हा महापालिकेत परतल्यानंतर उबाळे यांच्याकडे मालमत्ता विभाग काढून पुन्हा रमेश पवार यांच्याकडे देताना सहआयुक्त अजित कुंभार यांच्याकडील शिक्षण विभाग उबाळे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मात्र, कुंभार यांनी शिक्षण विभागाला योग्य दिशा देत विविध उपक्रम राबवण्याकडे भर दिला होता. परंतु मागील काही दिवसांमध्ये ही घडी पुन्हा विस्कटलेली पाहायला मिळत होती. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षण विभागाची जबाबदारी अजित कुंभार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – Holi 2023: होळीसाठी झाडे कापण्याची हिंमत करू नका, नाहीतर जाल आत)
दरम्यान, उबाळे यांच्याकडे उपायुक्त पद रिक्त झाले असून सहायक आयुक्तांमधून सेवा ज्येष्ठ अधिकाऱ्याला उपायुक्तपदी बढती मिळणार आहे. सध्या जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांना उपायुक्तपदी बढती मिळणार असून जर त्यांना उपायुक्तपदी बढती मिळाल्यास त्यांच्याकडे कोणत्या पदाचा भार सोपवायचा याचा प्रश्न आयुक्तांपुढे असल्याचेही बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community