चार्ल्स डिकन्स (Charles Dickens) हे राणी व्हिक्टोरिया यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय कादंबरीकार होते. तसेच ते एका सामाजिक चळवळीचे सदस्यही होते. चार्ल्स डिकन्स यांनी डझनभर प्रमुख कादंबऱ्या, त्यापेक्षाही संख्येने जास्त असलेल्या लघुकथा, असंख्य नाटके आणि अनेक वास्तववादी पुस्तके लिहिली. जी आजच्या काळातही सर्वाधिक लोकप्रिय आहेत. आपल्या साहित्यातून त्यांनी समकालीन इंग्रजी समाजाचे मनोरंजन तर केलेच पण त्यासोबतच समाजाला एक दिशाही दिली.
चार्ल्स डिकन्स यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८१२ साली लंडन येथे झाला. चार्ल्स डिकन्स (Charles Dickens) यांचे वडील एक सामान्य सरकारी क्लार्क होते. त्यांना आपल्या कामाईपेक्षा जास्त पैसे खर्च करण्याची सवय होती. त्यांच्या या सवयीमुळे त्यांना आयुष्यभर सतत आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. चार्ल्स डिकन्स लहान असताना त्यांच्या वडिलांना घेतलेले कर्ज परत फेडता आले नाही म्हणून तुरुंगात जावे लागले होते. अशावेळी संकटाच्या काळात चार्ल्स डिकन्स यांना आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी शू पॉलिशच्या कारखान्यात काम करावे लागले होते. त्यांनी ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ आणि ‘लिटिल डोरिट’ नावांच्या या दोन कादंबऱ्यांमध्ये आपला हा अनुभव रेखाटला केलेला आहे.
(हेही वाचा – PM Modi Criticizes Congress : नेहरु भारतियांना आळशी, कमी अक्कल असलेले समजत; पंतप्रधान मोदी लोकसभेत आक्रमक )
चार्ल्स डिकन्स यांची आईसुद्धा फार शिकलेली नव्हती. तिचा त्यांच्या शिक्षणालाही फार विरोध होता. चार्ल्स यांनी तिची क्रूर प्रतिमा मिसेस निकलबी नावाच्या पात्रात रंगवली आहे. मिस्टर मिकाव्बर आणि मिस्टर डोरिट ही दोन्ही पात्रे त्यांच्या वडिलांची प्रतिमा आहेत. चार्ल्स डिकन्स यांच्या प्रसिद्ध साहित्य कलाकृतींमध्ये “स्केचेस ऑफ द बो”, “पिकविक पेपर्स”, “ऑलिव्हर ट्विस्ट”, “निकोलस निकलेबी”, “ओल्ड क्युरिऑसिटी शॉप”, “बार्नाबी रुज”, “मार्टिन चुझलविट”, “डंबी अँड हिज सन”, ” डेव्हिड कॉपरफिल्ड.”, “ग्रेट एक्स्पेक्टेशन्स”, “ए टेल ऑफ टू सिटीज” इत्यादी डझनभर जगप्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.
या सर्व कथांमध्ये चार्ल्स डिकन्स यांनी तत्कालीन इंग्रजी समाजातील वाईट रूढी, परंपरा आणि दुष्प्रवृत्तींच्या विरोधात जोरदार प्रहार केले आहेत. अनाथाश्रम, शाळा, सरकारी कार्यालये, न्यायालये, कारखाने यावर त्यांनी कादंबऱ्यांतून टीका केली. त्याचे कारण असे की, अनाथाश्रमातील मुलांना पुरेसे अन्न मिळत नव्हते. सरकारी कार्यालयांमध्ये कामाच्या फायली नुसत्या इकडून तिकडे फिरत राहिल्या. न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे निकाल लागत नव्हते. मोठमोठे उद्योगपती आपल्या कारखान्यांतील कामगारांचे खूप शोषण करायचे. ९ जून १८७० साली चार्ल्स यांनी अखेरचा श्वास घेतला.
चार्ल्स डिकन्स यांच्या बालपणीच्या आयुष्याची अशी दयनीय कहाणी आजही त्यांच्या साहित्यात जिवंत आहे. त्यांनी अशी शेकडो अमर पात्रे निर्माण केली आहेत, जी सामाजिक स्मृतींमध्ये जतन केली गेलेली आहेत. चार्ल्स डिकन्स यांनी यशस्वीपणे स्वतःचे असे वेगळे जग निर्माण केले आहे. कथाकथन करण्यात चार्ल्स तरबेज होतेच, पण त्यांनी नुसते मनोरंजन करण्याऐवजी आपल्या वाचकांचा सांस्कृतिक आणि नैतिक स्तरही उंचावला. ज्याप्रमाणे ग्रामीण इंग्लंडचे सर्वोत्तम कवी शेक्सपियर होते, त्याचप्रमाणे लंडनच्या सौंदर्याचे वर्णन करणारे उत्कृष्ट कवी चार्ल्स डिकन्स हे होते. त्यामुळेच ब्रिटिश लोकांमध्ये चार्ल्स डिकिन्स यांचे नाव आजही सन्मानाने घेतले जाते.