गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वीजग्राहकांना मिळणार गोड बातमी!

167

मुंबईतील घरगुती वीजग्राहकांना एक गोड बातमी आहे. मुंबईकर वापरत असलेल्या टाटाचे वीजदर चार टक्क्यांनी कमी होणार आहे. मात्र अदानीच्या वीज दरात मात्र वाढ होणार असून बेस्टचे वीजदरही स्थिर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरगुती वीजग्राहकांना ही गोड बातमी मिळणार असून महावितरणचे वीजदर दोन टक्क्यांनी कमी होणार आहेत.

महिन्याचे बिल ३० रुपयांनी वाढणार

नव्या वीजदराप्रमाणे टाटाच्या घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला असून हे नवे वीजदर १ एप्रिलपासून लागू होणार असल्याची माहिती मिळतेय. तर या ग्राहकांच्या वीजदरात ४ टक्के कपात होईल, तर महावितरणचे दर २ टक्क्यांनी कमी होणार आहे. दुसरीकडे अदानीच्या वीजग्राहकांच्या बिलात युनिटमागे १ ते ६ पैशांची वाढ होईल. त्यामुळे महिन्याचे बिल ३० रुपयांनी वाढणार आहे. अदानीची घरगुती ग्राहकांच्या तुलनेत व्यावसायिक वापर आणि औद्योगिक वापर असलेल्या वीजग्राहकांची बिले कमी होणार असून, त्यांना दिलासा मिळाला आहे. तर बेस्टच्या वीज दरात कोणताही बदल झालेला नाही.

ग्राहकांना मोजावे लागणार असे दर

मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या १०० युनिट वर्गवारीतील ग्राहकांना प्रति युनिट ४ रुपये ८२ पैशांऐवजी ४ रुपये ७१ पैसे मोजावे लागतील. तर १०१ ते ३०० युनिटमधील ग्राहकांना ८ रुपये ७२ पैशांऐवजी ८ रुपये ६९ पैसे, ३०१ ते ५०० युनिटमधील ग्राहकांना ११ रुपये ७४ पैशांऐवजी ११ रुपये ७२ पैसे आणि ५०० युनिटवरील ग्राहकांना १३ रुपये २० पैशांऐवजी १३ रुपये २१ पैसे मोजावे लागतील. यासह व्यावसायिक वापर असलेल्या ग्राहकांना प्रति युनिट ११ रुपये २० पैशांऐवजी १०.९५ पैसे, तर औद्योगिक वीज वापर असलेल्या ग्राहकांना ६ रुपये ९६ पैशांऐवजी ६ रुपये ८९ पैसे मोजावे लागणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.