छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात पहाटे-सकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक फिरण्यास येत असतात. या मॉर्निंग वॉकच्या वेळी महापालिकेच्या वतीने रस्ता आणि फुटपाथवर झाडू मारण्याचे काम सुरू असते. या साफसफाईमुळे फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना या कचऱ्याचा आणि त्यामुळे उडणाऱ्या धुळीचा प्रचंड त्रास होतो. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने अतिरिक्त मनुष्यबळ वापरून शिवाजी पार्क परिसरातील अंतर्गत आणि बाहेरील भागासह जॉगिंग ट्रॅक आणि पदपथावरील साफसफाई ही रात्रीच्या वेळेत करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांच्या साफसफाईत केलेल्या या बदलामुळे दादर- शिवाजी पार्ककरांची मॉर्निंग वॉक स्वच्छ, सुंदर आणि धूळ मुक्त वातावरणात होणार आहे.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात सकाळच्या वेळेत नागरिक फेरफटका मारण्यास येत असतात. बदलत्या जीवन शैलीमुळे सकाळी आणि संध्याकाळी जास्तीत जास्त चालणे हे आरोग्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांच्या माध्यमातून दिला जातो. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून पहाटे, सकाळी फिरण्यास आणि शारीरिक कसरत करण्यासाठी शिवाजी पार्क परिसरातील गर्दी वाढताना दिसत आहे. सकाळच्या शुद्ध हवेत फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना परिसर स्वच्छ राखण्यासाठी झाडलोट करणाऱ्या महापालिकेच्या सफाई कामगारांच्या साफसफाईमुळे धुळीचा त्रास होतो, तसेच यामुळे सफाई कामगारांच्या कामातही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे येथे फिरण्यास येणाऱ्या नागरिकांच्या त्रासाची दखल घेत स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी महापालिका सूचना करत ही सफाई सकाळची न करता रात्रीची करावी अशी विनंती केली. याची दखल घेत उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, परिमंडळ दोनचे उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) इरफान काझी यांच्या टीमने रात्री १० नंतर अतिरिक्त ८ कामगारांची टीम तैनात करून उद्यान गणेश मंदिर, बंगाल क्लब, शिवाजी पार्क जिमखाना, स्वामी समर्थ व्यायाम मंदिर, माँसाहेब मिनाताई ठाकरे पुतळा, आजी आजोबा उद्यान, स्काऊट अँड गाईड हॉल आदी छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील आतील खेळपट्टीवर भाग तसेच परिसरातील जॉगिंग ट्रॅक आणि रस्त्यांच्या पदपाथ अशाप्रकारे कचऱ्याची साफसफाई केली जाते. त्यानंतर पुन्हा ९ नंतर ६ कामगारांची टीम व दुपारी पुन्हा ४ कामगारांची टीम सक्रिय ठेवून या मैदान परिसराच्या आतील व बाहेरील भागाची स्वच्छता राखली जाते. फेब्रुवारी महिन्यापासून या नव्या संकल्पनेनुसार स्वच्छतेची सेवा दिली असून यामुळे शिवाजी महाराज उद्यान परिसरात फिरण्यास येणाऱ्या नागरिकांना धुळमुक्त आणि स्वच्छ वातावरणात फिरता येते, असा विश्वास महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा – महापालिकेच्या खासगी सुरक्षा रक्षकांना बदलणार)
Join Our WhatsApp Community