ठाणेकरांना अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

167

ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा आणि बारवी धरणातून 50 दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोट्यातील 20 दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसर तसेच दिवा परिसरासाठी साडेसहा दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी घेतला.

( हेही वाचा : विदर्भातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी २० अतिरिक्त गाड्यांचे नियोजन)

सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणीप्रश्नांची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाणेचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबल्गन, खा. डॉ श्रीकांत शिंदे, आ. रवींद्र फाटक यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 485 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठा कमी पडतो. हे लक्षात घेऊन बारवी आणि भातसा धरणांतून प्रत्येकी 50 दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर या धरणातून शहराला 100 दशलक्ष लिटर पाणी मिळावे असा आग्रह महापालिका प्रशासनाने धरला होता. जलसंपदा विभागाने अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील कार्यवाही तात्काळ करावी असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. ठाणे मनपा बरोबर कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर मनपा क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत जलसंपदा एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

धरणांच्या कामांना गती द्यावी

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.भातसा, नामपाडा, पोवाले, काळू आणि शाई या धरणांच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यासोबतच या धरणांच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सुर्या धरणातून 218 दशलक्ष लिटर पाणी साठा करण्याबाबत एमएमआरडीएने तात्काळ कार्यवाही करावी. तसेच उल्हासनगर मनपाचाही पाणी प्रश्न सोडविण्याठी एमआयडीसीने योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.