यंदा मुंबईतील नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे चोखपणे पार पडली गेली आहेत, त्याचा प्रत्यय जोरदार पावसाच्यावेळी (Heavy Rain) पाण्याचा वेगाने निचरा होवून आला आहे. या कामगिरीबद्दल मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे, असे उद्गार काढत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पावसाळापूर्व कामे योग्यरितीने पार पडल्याची पोचपावती दिली. मुंबईत सातत्याने पाऊस कोसळत असताना महानगरपालिका आयुक्तांसह सर्व विभागांचे सहायक आयुक्त व सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाची पाठही थोपटली. पावसाची परिस्थिती व अंदाज लक्षात घेवून स्थानिक प्रशासनाने योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देशही राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हा जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले असल्याचेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबईत सतत कोसळत (Heavy Rain) असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, मुंबईतील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना (नर्सरी ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या) गुरुवार दिनांक २० जुलै २०२३ रोजी महानगरपालिकेने सुटी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने मुंबईतील पावसाच्या (Heavy Rain) शक्यतेसाठी दिलेल्या ‘ऑरेंज अलर्ट’ च्या पार्श्वभूमीवर नागरी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला बुधवारी भेट दिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. घराकडे परतीचा प्रवास करत असणाऱ्या चाकरमान्यांची आवश्यकता असेल तेथे तात्पुरता निवारा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्याचे निर्देशही यावळी मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले.
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे मान्यवर या भेटीप्रसंगी उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) . श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे, सहआयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडळकर, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर आदींनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व माहिती मान्यवरांना सादर केली.
(हेही वाचा – Irshalgad Landslide : रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेक कुटुंब मलब्याखाली अडकली; मुख्यमंत्री शिंदे घटनास्थळी दाखल)
मुंबईतील (Heavy Rain) जनजीवन, महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना, वाहतूक व्यवस्था तसेच पाणी साचणाऱ्या सखल ठिकाणांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षातून घेतला. बेस्ट आणि एसटी प्रशासनालाही नागरिकांसाठी वाहतूकीची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. हिंदमाता, परळ, गांधी मार्केट, मिलन भूयारी मार्ग, अंधेरी भूयारी मार्ग या अत्यंत सखल भागातील स्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. कोणत्याही ठिकाणी पाणी साचले नाही. महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णपणे कार्यरत असल्याचा हा परिणाम आहे. संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे ४५० ठिकाणी पावसाचे पाणी उपसा करणारे पंप लावल्याचा परिणाम म्हणून पाण्याचा वेगाने निचरा झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
पुढे ते म्हणाले की, मुंबईत पर्जन्य (Heavy Rain) जलवाहिन्या, मलनिसारण वाहिन्या आदींच्या प्रवेश मार्गांवर (मॅनहोल) असलेल्या झाकणाखाली जाळ्या लावण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत सखल भागातील सुमारे ३ हजार मॅनहोल कव्हरखाली जाळ्या लावण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरीत ठिकाणच्या मॅनहोल जाळ्या लावण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश दिले आहेत. ज्याठिकाणी मॅनहोल चोरीचे प्रकार निदर्शनास येत आहेत, अशा ठिकाणी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या परिस्थितीविषयी माहिती देताना ते म्हणाले की, विभागीय पातळीवर खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत. कोणत्याही नागरिकाच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करावी. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवून सर्व रस्त्यांवर वाहतूक तत्काळ सुरू होईल, असे पहावे, असे निर्देशही मुख्यमंत्री महोदयांनी दिले. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असून कोणतीही दुर्घटना अथवा अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहे, असेही मुख्यमंत्री महोदयांनी अखेरीस नमूद केले.
Join Our WhatsApp Community