Anti Narcotics Campaign : अंमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहिम राबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

175

मुंबई अंमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून गेल्या आठवडाभरात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणांहून ३५० पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. या मोहिमेला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘मिशन थर्टी डेज’ मोहिम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.

अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढी बरबाद होत असून त्यापासून त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची मोहिम हाती घ्या. अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा करणाऱ्यांवर धडक कारवाई करा, असेही मुख्यंमत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. मंगळवार, ९ मे रोजी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ मुक्त मुंबई संदर्भात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

अंमली पदार्थ मुक्त मोहिमेबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले. मुंबई पोलिस, नार्कोटेक्स् सेल यांच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाई बाबत यावेळी माहिती देण्यात आली. अंमली पदार्थ बाळगल्याबद्दल गेल्या दहा दिवसात मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये २५४ गुन्हे दाखल करण्यात आले असून २६३ जणांना अटक करण्यात आली आहे तर सुमारे २ कोटी ५९ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अंमली पदार्थविरोधी कक्षाने केलेल्या कारवाईत २२ जणांना अटक केली असून २ कोटी ६० लाख ४२ हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेमार्फत केलेल्या कारवाईत २ कोटी २४ लाख ५८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून एकूण ७ कोटी ४४ लाखांचा माल जप्त झाला आहे.

(हेही वाचा Vivek Agnihotri : आता प. बंगालमधील नरसंहारावर चित्रपट; विवेक अग्निहोत्री यांच्याकडून ममता बॅनर्जींना कायदेशीर नोटीस)

गेल्या आठवडाभरात मुंबई पोलिस, मुंबई महापालिका यांच्यावतीने अंमली पदार्थ विक्री करणारे पान ठेले, हॉकर्स, रेल्वे स्थानकांवरील हॉकर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयाजवळील सुमारे १३७१ पान ठेल्यांवर कारवाई करून हटविण्यात आले आहेत. कोटपा कायद्यांतर्गत ई सिगारेटस् प्रकरणी ७३९१ जणांवर कारवाई झाली आहे. पदपथावरील ६२६३ हॉकर्स आणि रेल्वे स्थानकांवरील २८१९ हॉकर्स विरुद्ध देखील या मोहिमेंतर्गत कारवाई झाली आहे.

शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील पान ठेल्यांवर कारवाई करून व्यसनाच्या दुष्परिणामाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिम घेण्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. अंमली पदार्थ निर्मितीचे कारखाने उध्वस्त करा. मुंबई महानगरातील विद्यालयांना जनजागृती मोहिमेत सहभागी करून अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. अंमली पदार्थांचा पुरवठा रोखला पाहिजे त्यासाठी केंद्रीय यंत्रणांची मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. अंमली पदार्थ मुक्त मुंबई करतानाच राज्यात अन्यत्र मोठ्या प्रमाणावर त्याचे पेव फुटले आहे का याबाबत दक्ष राहून कारवाई करावी. जनजागृतीसाठी अन्न व औषध प्रशासन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क या विभागांची एकत्रित बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यासंदर्भात जनजागृतीची मोहिम हाती घेण्यात आल्याचे मुंबई पोलिस आयुक्त फणसळकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या सुमारे ७००० शिक्षकांचे या मोहिमेंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण दिल्याचे फणसळकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.