दरवर्षी इतक्या मुलींना गमवावा लागतो बालविवाहामुळे जीव

बालविवाहामुळे जागतिक स्तरावर दररोज 60 हून अधिक मुली आणि दक्षिण आशियात दररोज सहा मुलींचा मृत्यू होतो, असे एका विश्लेषणात समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जारी केलेल्या एका नव्या विश्लेषणानुसार हा दावा केला जात आहे. दरवर्षी अंदाजे 22 हजार मुलींना बाळंतपणात आपला जीव गमवावा लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दक्षिण आशियामध्ये दरवर्षी 2 हजार (किंवा दररोज सहा) बालविवाह संबंधित मृत्यू होतात. त्यानंतर पूर्व आशिया आणि पॅसिफिक खंडात 650 मृत्यू (किंवा दररोज दोन) आणि लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियनसह 560 वार्षिक मृत्यू (दिवसातून जवळजवळ दोन) होतात, असे सेव्ह द चिल्ड्रनच्या अहवालात म्हटले जात आहे.

(हेही वाचाः वायू प्रदुषणाचा धोका वाढला… डब्ल्यूएचओच्या अहवालात मोठा खुलासा)

काय आहे बालविवाहाचे प्रमाण

दरवर्षी अंदाजे 22 हजार पेक्षा जास्त मुली बालविवाहामुळे गर्भवती होतात आणि बाळंतपणात त्यांचा मृत्यू होतो. बालविवाहामुळे दररोज 60 पेक्षा जास्त मुली जागतिक स्तरावर आणि दक्षिण आशियामध्ये दररोज 6 मुली मृत्युमुखी पडत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत बालविवाहाचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे आणि जागतिक स्तरावर बालविवाहाशी संबंधित अंदाजे मृत्यूंपैकी जवळजवळ दिवसाला 26 मृत्यू होत आहेत.

लॉकडाऊन दरम्यान वाढले बालविवाह

किशोरवयीन मातांच्या मृत्यूचा दर जगातील इतर मृत्यूंच्या प्रमाणापेक्षा चार पटीने जास्त आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये जागतिक स्तरावर जवळपास 80 दशलक्ष बालविवाह रोखले गेले होते. पण कोरोना काळात बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने आरोग्य सेवा तणावाखाली आल्याने आणि बरीच कुटुंब गरिबीत ढकलली गेल्याने बालविवाहांचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊन दरम्यान लाखो महिला आणि मुलींना हिंसाचाराला सामोरे जावे लागले. 2030 पर्यंत आणखी 10 दशलक्ष मुलींची लग्न होण्याची शक्यता आहे. म्हणून बालविवाहांमुळे मुलींच्या जीवाला धोका असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

(हेही वाचाः ‘ती’ पीडीएफ फाईल उघडू नका… सायबर पोलिसांनी दिला इशारा)

मुलींचे सर्वाधिक नुकसान

बालविवाह हा मुलींवरील लैंगिक आणि लिंग-आधारित हिंसाचाराचा सर्वात वाईट आणि घातक प्रकार आहे. असे सेव्ह द चिल्ड्रन इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंगर एशिंग म्हणाले. दरवर्षी, लाखो मुलींना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांशी विवाह करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे त्या मुलींना शिकण्याची संधी मिळत नाही. त्या लहान वयातच माता बनतात आणि घरकामांत गुंतून जातात. किशोरवयीन मुलींनी बाळाला जन्म देणे, म्हणजे त्यांचा खून करण्यासारखे आहे. कारण, त्या मुलींचे शरीर बाळाला जन्म देण्यासाठी पक्व नसते. सरकारने मुलींना प्राधान्य दिले पाहिजे. बालविवाह आणि अकाली प्रसूती या संबंधित मृत्यूंपासून त्यांना संरक्षित केले पाहिजे, असे आशिंग पुढे म्हणाले.

मुलींना शिकण्याचा, आनंदी आणि निश्चिंत बालपण उपभोगण्याचा मुलभूत हक्क आहे. त्यामुळे बालविवाह करणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे आणि त्याचा निषेध करणे आवश्यक आहे. बालविवाहाकडे एक सांस्कृतिक घटक म्हणून पाहिलं जाऊ नये. त्याऐवजी जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार त्या मुलींना दिला जावा, असं आशिंग यांनी म्हटले.

(हेही वाचाः वारकरी शिल्पाची समाजकंटकांकडून मोडतोड! ठाकरे सरकारविरोधात संताप)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here