मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना छत्री ऐवजी प्रत्यक्षात पैसे वाटप करण्यात आल्यानंतर आता दप्तर, पाण्याची बॉटल आणि खाऊचा डबा आदींऐवजी पैशांचे वाटप विद्यार्थांना केले जाणार आहे. या वस्तूंऐवजी मुलांना पैसे वाटप करण्यास प्रशासकांनी मान्यता दिली. त्यानुसार आता महापालिका शाळांमधील मुलांना कमीत कमी ५१० आणि जास्तीत जास्त ७६० रुपये इयत्तेनुसार पैशांचे वाटप केले जाणार आहे.
( हेही वाचा : ठाणे विभागासाठी कळवा येथे विकसित होणार अद्ययावत बसपोर्ट)
खरेदीचे प्रस्ताव १७ जून २०२२पासून मंजूर
मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय २००७मध्ये घेण्यात आल्यानंतर तेव्हापासून मुलांना या वस्तूंचे वाटप केले जात आहे. परंतु या वर्षी निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याने या शालेय वस्तूंच्या खरेदीचे प्रस्ताव १७ जून २०२२पासून मंजूर करण्यात आले. त्यामुळे मुलांना शालेय साहित्य मिळण्यास विलंब झाला आहे. मुलांना हे साहित्य आता जुलै महिन्यांमध्ये मिळू लागले आहे.
या निविदा खरेदीच्या प्रक्रीयेत छत्री खरेदीला प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने पुन्हा यासाठी निविदा न मागवता विद्यार्थ्यांना छत्री वेळीच उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येकी २७० रुपये एवढी रक्कम मुलांना मुख्यध्यापकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली होती. महापालिका प्रशासनाने मुख्यध्यापकांची स्वतंत्री खाती निर्माण करून त्याद्वारे शाळांमध्ये छत्रीचे पैसे उपलब्ध करून दिले. आतापर्यंत छत्रीचे पैसे उपलब्ध करून दिल्यांनतर मुलांच्या हाती छत्री पडली. इयत्ता ७ वी ते १०वीच्या मुलांना छत्री उपलब्ध झाल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाने दिली आहे.
मुलांना छत्री ऐवजी पैसे दिल्यानंतर आता दप्तर, पाण्याची बॉटल व खाऊचा डबा आदी वस्तूंऐवजी मुलांना पैसे वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासकांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याने पुढील आठ दिवसांमध्ये पैसे वाटपाची प्रक्रीया पूर्ण होत मुलांच्या हाती दप्तर, बॉटल आणि खाऊचा डबा आदी वस्तू पडतील,असा विश्वास सहआयुक्त अजित कुंभार यांनी व्यक्त केला आहे.
पूर्व प्राथमिक ते दुसरी इयत्तेतील मुलांना प्रत्येकी ५१० रुपये, इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या मुलांसाठी प्रत्येकी ६२० रुपये आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना प्रत्येकी ७६० रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे. मुख्याध्यापकांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल आणि त्यांच्या माध्यमातून मुलांच्या पालकांना ही रक्कम उपलब्ध करून दप्तर व इतर साहित्य खरेदी केले जाणार आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांमध्ये दप्तर, पाण्याची बाटली आणि खाऊचा डबा हे साहित्य मुलांना उपलब्ध होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच यापूर्वी मंजूर केलेल्या प्रस्तावांपैकी रेनकोटचे वाटप ८० टक्के तर इतर स्टेशनरी साहित्यासह बूट व मोजे आदी साहित्यही मुलांना आता उपलब्ध होऊ लागले आहेत,असेही त्यांनी सांगितले.
अशाप्रकारे मुलांना उपलब्ध दप्तराची रक्कम
- पूर्व प्राथमिक ते दुसरी इयत्ता : प्रत्येकी ५१० रुपये
- इयत्ता तिसरी ते सातवी : प्रत्येकी ६२० रुपये
- इयत्ता आठवी ते दहावी : प्रत्येकी ७६० रुपये