चीनच्या हुनान प्रांतात गाड्या एकमेकांवर आदळून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला असून ६६ जण जखमी झाले आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. हुनानमध्ये अपघातावेळी १० मिनिटांमध्ये ५० वाहने एकमेकांवर आदळल्याची माहिती मिळाली असून यामुळे अनेक वाहनांनी पेट घेतला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.
( हेही वाचा : उद्धव ठाकरेंना धक्का; नाशिकमधील ज्येष्ठ शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश )
१० मिनिटांमध्ये ५० वाहनांची टक्कर
चीनच्या मीडिया हाऊस पीपल्स डेलीने या घटनेचा व्हिडिओ शेअर करून माहिती दिली. ट्रकला भीषण आग लागल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. १० मिनिटांमध्ये तब्बल ५० वाहनांची टक्कर झाली. ही वाहने एकमेकांवर कशी आदळली, एवढा मोठा अपघात कसा झाला याचा सध्या तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमींना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अलिकडेच धुक्यामुळे चीनमध्ये २०० वाहने एकमेकांना धडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Join Our WhatsApp Community