पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल – बोरिवली दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले असून मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) बोरिवली ते विरार दरम्यानच्या पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या मार्गिका पूर्ण झाल्यास मेल, एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका तयार होईल आणि परिणामी, भविष्यात चर्चगेट- विरार दरम्यानच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होईल आणि लोकल प्रवास सुद्धा जलद होईल असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
( हेही वाचा : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना घाट राहणार 3 महिने बंद!)
लोकल फेऱ्या वाढण्यास मदत
बोरिवली ते विरार पाचव्या – सहाव्या मार्गिकेचे काम लवकरच एमआरव्हिसीकडून करण्यात येणार आहे. एमआरव्हिसीने या प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान वांद्र्यापासून बोरिवलीपर्यंत पाचव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. सध्या चर्चगेट ते विरारदरम्यान दोन धीम्या लोकलच्या आणि दोन जलद मार्गिका उपलब्ध आहेत. पाचवी – सहावी मार्गिका नसल्याने मेल, एक्स्प्रेस जलद मार्गिकेवरूनच धावतात. यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यास लोकल प्रवास सुकर होईल आणि लोकल फेऱ्याही वाढण्यास मदत होईल.
प्रवाशांना होणार फायदा
- लोकल प्रवास सुकर होईल
- लोकल फेऱ्याही वाढण्यास मदत
- लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार नाही
- मेल – एक्स्प्रेस स्वतंत्र मार्गिका