तळोजा नोडमधील 2500 घरांची 15 ऑगस्टला सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. होळीच्या मुहूर्तावर या घरांसाठी योजना जाहीर केली होती. परंतु, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यातील शिल्लक राहिलेल्या सुमारे अडीच हजार घरांसाठी पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय संबंधित विभागाने घेतल्याचे समजते.
कोरोनामुळे केंद्राची योजना रेंगाळली
केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेंतर्गत सिडकोने 2018 मध्ये सुमारे 15 हजार घरांची योजना जाहीर केली होती. त्यानंतर लगेच कोरोनाची महामारी आल्याने ही योजना रेंगाळली. परिणामी अनेक लाभार्थींनी ही घरे घेण्यास असमर्थता दर्शवली, तसेच आवश्यक कागदपत्रांचा अभाव आणि इतर कारणांमुळे यातील जवळपास सात हजार घरे शिल्लक राहिली होती. ती विकण्यासाठी सिडकोने विविध योजना जाहीर केल्या. कोविड योद्धा आणि पोलिसांसाठी विशेष योजना जाहीर करुन शिल्लक घरे विकण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
( हेही वाचा: …..म्हणून भूतान भारताचा हिस्सा बनू शकला नाही! )
सुविधांचा अभाव
होळीच्या मुहूर्तावर विविध नोडमध्ये शिल्लक राहिलेल्या 6 हजार 508 घरांची योजना जाहीर करण्यात आली. त्यात सर्वाधिक म्हणजेच 5 हजार 775 घरे एकट्या तळोजा नोडमधील होती. या योजनेची सिडकोने मोठी जाहिरातबाजी केली. परंतु, तळोजा येथील पायाभूत सुविधांचा अभाव, पाण्याचा प्रश्न, दळणवळणाच्या अपु-या सुविधा आदींमुळे ग्राहकांनी पुन्हा येथील घरांकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.