सिडकोतर्फे गुढीपाडव्याच्या शुभदिनी महाधमाका जाहीर करण्यात आला आहे. या शुभदिनी विविध भूखंड, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी सदनिका, वाणिज्यिक गाळे तसेच, निवासी आणि सामाजिक उद्देशांसाठी भूखंड ई- लिलाव तथा ई -निविदा प्रक्रियेद्वारे विक्रीकरता उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या महायोजनेचा आरंभ नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शानाखील 2 एप्रिलला करण्यात येणार आहे.
सर्वसामान्यांना आपले हक्काचे घर मिळणार
नवी मुंबईतील खारघर, घणसोली, कळंबोली, तळोजा व द्रोणागिरी नोड्समध्ये या विविध योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाणिज्यिक गाळ्यांमुळे व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यासोबतच वृद्धिंगत करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. तसेच, लहान व मोठ्या आकाराच्या निवासी आणि वाणिज्यिक भूखंडांमुळे बांधकाम विकसकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही आपले हक्काचे घर साकारण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
( हेही वाचा: विराटमुळे गमवावी लागली चाहत्याला गर्लफ्रेन्ड, मैदानावरच झळकावले पोस्टर! )
या संकेतस्थळावर करा नोंदणी
सिडकोच्या लोकप्रिय गृहनिर्माण योजनांमध्ये मध्यम उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गटासाठी सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेतील वाणिज्यिक गाळ्यांची आणि भूखंडांची विक्री ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेद्वारे पार पडणार आहे. याकरिता https://cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्ज नोंदणी, अनामत रक्कम व शुल्क भरणा, निविदा सादर करणे, लिलाव या सर्व प्रक्रियेची माहिती वरील संकेतस्थळासोबतच सिडकोच्या अधिकृत समाजमाध्यमांवर वेळोवेळी देण्यात येणार आहे.