महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता ठाणे जिल्ह्यातही नवा सीमावाद निर्माण झाला आहे. दिव्यातील नागरिकांनाही ठाणे जिल्ह्यात राहण्यास नकार दिला आहे. आम्हाला ठाणे महापालिकेकडून कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हाला ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतून वगळण्यात यावे, अशी मागणी दिवेकरांनी केली आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीतून वगळण्याची मागणी जागा हो दिवेकर या संस्थेने केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. गेली अनेक वर्षे ठाणे महापालिका क्षेत्रात असूनही अनेक मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याचा दावा करत या संस्थेने दिवा परिसर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जोडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे दिवा सीमावादाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
( हेही वाचा :प्रतापगडानंतर आता ‘या’ गडावरील अतिक्रमण हटवले )
यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना पत्र दिले आहे. ठाणे महापालिका स्थापित होऊन जवळपास 40 वर्षे होऊन गेली. त्यात बरीच खारजमीन, खाडीप्रदेश समाविष्ट झाला. त्यात खूप मोठा भाग म्हणजे दिवा ग्रामीण परिसर आहे. ज्यात दातीवली, बेतवडे, साबे, आगासन, म्हातार्डी, देसाई, पडले, खिडकाली शीळ, खार्डी असा बराचसा खाडीकिनारी परिसर ठाणे महापालिकेने खूप मोठी आश्वासने देऊन समाविष्ट करुन घेतला. ज्याला आधीपासूनच भूमीपुत्रांचा विरोध होता. परंतु महापालिकेने काही स्थानिकांना विश्वासात घेऊन ग्राामस्थांचा विश्वास संपादन केला. परंतु दुर्दैवाने आम्ही ठेवलेला विश्वास हा आमचा विश्वासघातच ठरला. ठाणे महापालिका आज इतकी वर्षे होऊन आम्हाला कोणत्याही मुलभूत सुविधा पुरवू शकली नाही, असा आरोप भोईर यांनी पत्रात केला आहे.
Join Our WhatsApp Community