संपूर्ण मुंबईत पूर्व उपनगरात मध्यवर्तीय आर.टी.ओ. कार्यालय नसून हे कार्यालय मुलुंड येथील मुलुंड जकात नाका पूर्व व पश्चिम किंवा ऐरोलीतील जकात नाक्यावर उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाने केली आहे. भाजपाचे मुलुंडमधील नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी मागील सरकारकडे ही मागणी केली होती. त्यावेळी फडवणीस सरकारने सकारात्मक भूमिका घेतली होती, परंतु कालांतराने हे सरकार गेल्यानंतर याबाबतही कार्यवाही होवू शकली नाही. त्यामुळे त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्मरणपत्र पाठवून याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली.
मुलुंड ते घाटकोपर येथे सुमारे १५ लाखांच्या वर लोकवस्ती
मुलुंड ते घाटकोपर येथे सुमारे १५ लाखांच्या वर लोकवस्ती असून ही वाढती लोकवस्ती पाहता या भागांमधील जनतेसाठी आर.टी.ओ कार्यालय नाही. त्यामुळे याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत असलेले आर.टी.ओ हे शहरातील वडाळा येथे आहे. त्यामुळे उपनगरातील लोकांची तिथे वडाळ्याला जाताना प्रचंड गैरसोय होते. यासाठी नागरिकांचा संपूर्ण दिवस खर्ची जातो. बऱ्याच लोकांना यासाठी दिवसभराची सुट्टी घ्यावी लागते. उपनगरवासियांची ही गैरसोय लक्षात घेता मुलुंड पूर्व व पश्चिम येथील जकात नाक्याचे ठिकाण किंवा ऐरोलीतील जकात नाक्याच्या ठिकाणी आरटीओच्या पर्यायी कार्यालयाची व्यवस्था करावी आणि पूर्व उपनगरातील लोकांची सोय करावी, अशी मागणी भाजपाचे मुलुंडमधील नगरसेवक आणि बेस्ट समिती सदस्य प्रकाश गंगाधरे यांनी २९ डिसेंबर २०१७ रोजी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली हाती. परंतु पुढे सरकार बदलल्यानंतर याबाबतची कार्यवाही होवू शकली. त्यामुळे विद्यमान सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना याचे स्मरण करून देण्यासाठी प्रकाश गंगाधरे यांनी त्यांना पत्र पाठवत विद्यमान सरकारला मुलुंड येथे आरटीओ कार्यालय उभारण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचा : गोरेगाव, कांदिवली, बोरीवलीतील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास)
Join Our WhatsApp Community